आरटीओ’तील वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या बदल्या
नागपूर : परिवहन खात्यातून निवृत्त लक्ष्मण खाडे नागपुरातील हाॅटेल सेंटर पाॅईंटला आले असता ‘आरटीओ’च्या अधिकाऱ्यांनी तेथे गर्दी केली होती. यावेळी बदल्यांबाबतच्या अर्थकरणावर चर्चा रंगल्यावर नागपूर शहर पोलिसांनी ‘एसआयटी’मार्फत चौकशी केली.
बुधवारी काही वादग्रस्त ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे.
शासनाने बदली केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळांचा समावेश आहे. तिची नागपूर शहर कार्यालयातून अहमदनगरला बदली झाली. शेजवळ यांच्यावर नुकतेच लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून गुन्हाही दाखल केला गेला. तर नागपूर ग्रामीणचे संकेत गायकवाड आणि राजू मुरलीधर नागरे यांचीही अनुक्रमे हिंगोली आणि औरंगाबादला बदली झाली. दरम्यान तिघांच्या बदली आदेशावर पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या अहवालाचा संदर्भ आहे.
काही महिन्यांपूर्वी परिवहन खात्यातून निवृत्त अधिकारी नागपुरातील हाॅटेलमध्ये आल्यावर तेथे पूर्व विदर्भातील अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. हे बदलीसाठीचे अर्थकारण असल्याची चर्चा रंगल्यावर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सायबर विभाग, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा या तिन्ही शाखेतील प्रत्येकी एक सदस्य असलेल्या एसआयटीकडून चौकशी केली. त्यातच २४ मे रोजी आरटीओतील वादग्रस्त अधिकाऱ्यांसह कोल्हापूरच्या एक आणि चंद्रपूरच्या एका अधिकाऱ्याचीही बदली झाल्याने पुन्हा या बदली प्रकरणावर चर्चा रंगली आहे.