बाजारात उन्हाळी भुईमुगाची आवक सुरू
पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात उन्हाळी भुईमुगाची आवक सुरू झाली आहे. रविवारी पुणे विभागातून 150 ते 200 गोण्यांमधून भुईमूग बाजारात दाखल झाला.
घाऊक बाजारात त्याच्या प्रतिदहा किलोला 250 ते 300 रुपये दर मिळाला. तर किरकोळ बाजारात 50 ते 100 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी राज्यांच्या विविध भागांसह परराज्यातून 90 ते 100 ट्रकमधून फळभाज्यांची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत आवकेत किरकोळ वाढ झाली. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने भेंडी, गवार, टोमॅटो व घेवड्याच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली.
परराज्यातील कर्नाटक, गुजरात येथून सुमारे 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटक येथून 4 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार 5 ते 6 ट्रक मटार, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी 4 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 10 ते 12 टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1000 ते 1100 गोणी, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो सुमारे 11 ते 12 हजार क्रेट्स, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 10 ते 12 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, गाजर 5 ते 6 टेम्पो, भुईमुंग शेंग 125 ते 150 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, गावरान कैरी 2 ते 3 टेम्पो, कांदा सुमारे 80 ते 90 ट्रक, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाटा 30 ते 35 ट्रक इतकी आवक झाली.
पालेभाज्यांच्या भावात वाढ
उन्हाचा कडाका वाढल्याने मार्केटयार्डमध्ये रविवारी पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने घटली. परिणामी घाऊक बाजारात मेथीच्या भावात शेकडा जुडिमागे 200 रुपये, शेपू 600 रुपये, कांदापात 200 रूपये, चाकवत 100 रुपये, पुदिना 100 रुपये, पालक 300 रूपयांनी वाढ झाली. इतर सर्वच पालेभाज्यांचे भाव स्थिर होते. किरकोळ बाजारात देखील सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दर तेजीत होते. मार्केटयार्डात रविवारी कोथिंबिरीची 1 लाख 25 हजार जुडींची आवक झाली, तर मेथीची 50 हजार जुडी इतकी आवक झाली.