कोणताही क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात बाजी, करमाळ्याच्या शुभांगी केकान ५३०व्या रँकने उत्तीर्ण
करमाळा: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी परीक्षेचा निकाल नुकतीच जाहीर झालाय. ही परीक्षा पास होऊन सरकारी अधिकारी होण्याचं लाखो तरुणाईचं स्वप्न असतं. पण, खडतर परीक्षा आणि तीव्र स्पर्धेमुळे मोजकेच विद्यार्थी यामध्ये यशस्वी होतात.
यावर्षी झालेल्या युपीएससीच्या परीक्षेत यंदा पूर्ण देशात या परीक्षेमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. तर राज्यात देखील तेच चित्र पहायला मिळत आहे.अशातच महाराष्ट्रातील एका नावाची चर्चा आहे ते नाव म्हणजे करमाळा येथील शुभांगी सुदर्शन केकान यांची स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होण्याचं ध्येय बाळगणारी असंख्य मुलं-मुली अगदी बहुतेक कॉलेज शिक्षणापासूनच यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. यासाठी विशेष कोचिंग क्लास लावले जातात.
कोणताही क्लास नसताना पहिल्याच फटक्यात यश
आजकाल तर अगदी दिल्लीत जाऊन विशेष कोचिंग क्लासमध्ये जाऊन याची तयारी केली जाते. तरीही पहिल्याच फटक्यात यश मिळण्याची हमी नसते. अशा या अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या परीक्षेत कोणताही क्लास न लावता यशस्वी होण्याची किमया करून दाखवली आहे शुभांगी सुदर्शन केकान यांनी. विशेष म्हणजे शुभांगी यांनी लग्नानंतर ही परीक्षा दिली आहे.
शुभांगी ५३० रँकने उत्तीर्ण
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वंजारवाडी ता करमाळा येथील शुभांगी सुदर्शन केकान या केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या ५३० रँकने ही परीक्षा पास झाल्या आहेत. शुभांगी केकान यांचे वडील सुदर्शन केकान हे प्राथमिक शिक्षक होते. मार्च २०२३ मध्ये सुदर्शन केकान हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंधवडी ता करमाळा येथून सेवानिवृत्त झाले आहेत.
विशेष म्हणजे घरची सर्व जबाबदारी संभाळून त्यांनी हे यश मिळवलं आहे. शुभांगी यांना सहा वर्षाचा शिवम नावाचा मुलगाही आहे. लग्न झाल्यानंतर त्यांना स्पर्धा परीक्षा करण्याची प्रेरणा मिळाली अन् त्यातून मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. अशी प्रतिक्रिया शुभांगी यांनी दिली आहे.