पोटच्या ‘मुलाने’च केली जन्मदात्या ‘आई’ची हत्या
वर्धा : गाढ झोपेत असलेल्या आईवर मुलानेच काठीने वार करीत तिची हत्या केल्याने आर्वी तालुक्यात एकचP खळबळ उडाली आहे.
ही घटना आर्वी तालुक्यातील बेनोडा (माटोडा) येथे घडली असून कौशल्या महादेव तुमसरे (८२) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी हत्येच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी हेमराज महादेव तुमसरे (४२) रा. बेनोडा (माटोडा) याला अटक केली आहे.
बेनोडा (माटोडा) येथील घटनेची माहिती मिळताच आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी त्यांचे सहकारी सुनील मलनकर, इमरान खिलजी, दिगंबर रुईकर, किरण कुरडकर, अंकुश निश्चत, अतुल गोटफोडे, राहुल देशमुख यांच्यासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करीत कौशल्या तुमसरे यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाचा पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहेत.
वयोवृद्ध कौशल्या दोन्ही पायांनी अपंग
८२ वर्षीय कौशल्या या दोन्ही पायांनी अपंग असल्याने त्या जमिनीवर घासत घासत चालायच्या. कौशल्या आणि कौशल्याचा मुलगा हेमराज यांच्यात कुठल्या कारणावरून वाद होत तो विकोपाला जात हेमराजने थेट कौशल्याची हत्या केली या बाबतची अधिकची माहिती सध्या आर्वी पोलीस घेत आहे.
हेमराज दोन दिवसांपासून करीत होता चिडचिड
हेमराज तुमसरे हा मागील दोन दिवसांपासून चिडचिड करीत असल्याने त्याची पत्नी ललिता व मुलगी सलोनी हे चुलत भासरे रंगराव तुमसरे यांच्या घरी झोपण्यासाठी गेले होते. तर हेमराज व हेमराजची आई कौशल्या हे दोघेच घरी होते. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तुमसरे कुटुंबिय जागे झाले. अशातच काठीने मारहाण केल्या जात असल्याचा आवाज आल्याने हेमराजच्या घराचे दार उघडण्यात आले. तेव्हा हेमराज हा आई कौशल्या हिला काठीने मारहाण करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शीयांना दिसल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.