हमालांनी अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढा द्यावा : शरद पवार
अहमदनगर : हमाल माथाडी कायदा मोडीत काढण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. तसे झाले, तर कामगार, कष्टकरी, हमाल-मापाडी यांच्यावर मोठा अन्याय होणार आहे.
तो दूर करण्यासाठी एकजुटीने लढा देण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी (दि. 21) केले.
नगरच्या बाजार समितीच्या आवारात अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महासंघाच्या 21 व्या राज्यस्तरीय द्वैवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव अध्यक्षस्थानी होते. स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष तथा हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, अरुण कडू, गोविंदराव सांगळे आदी उपस्थित होते.
शरद पवार यांच्या हस्ते हमाल पंचायतीच्या प्रांगणात नगर जिल्हा हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष (स्व.) शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ज्येष्ठ हमाल शेख रज्जाक शेखलाल, कलाबाई उल्हारे, श्रीमती नलावडे, सुखदेव दळवी, द्रौपदाबाई अंधारे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.
शरद पवार या वेळी म्हणाले, की महाराष्ट्राने अनेक कायदे देशाला दिले. हमाल माथाडी कामगार कायद्याने कष्टकर्याच्या हाताला काम, खिशाला दाम आणि संरक्षण मिळते आहे. या कायद्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील यांच्यासोबत डॉ. बाबा आढाव, इतर कामगार नेते आणि आम्ही लढा दिला आणि हा कायदा झाला.
पण आज फडणवीस सरकारने हा कायदा रद्द करण्याचा घाट घातला आहे. गुंडगिरी दमदाटी आणि अन्य मार्गाचा आधार घेत हमाल मापाडी कष्टकर्यांच्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला. हा कायदा रद्द झाला तर तो हमाल वर्गावर मोठा अन्याय असेल तेव्हा यासाठी मोठा लढा एकजुटीने उभा करण्याची गरज आहे.
(स्व.) शंकरराव घुले यांचा ‘लोकनेते’ असा उल्लेख करत पवार म्हणाले की, त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ माथाडी आणि हमालांसाठी दिला. पालिकेत 25 वर्षे नगरसेवक, 7 वर्षे नगराध्यक्ष आणि अनेक वर्षे माथाडी कामगारांसाठी खस्ता खाणारा नेता म्हणून शंकरराव यांची ओळख आहे. त्यांचे स्मरण सर्वांना राहावे यासाठी त्यांचा पुतळा उभारला आहे. कामगार आणि कष्टकरी वर्गासाठी लढणारे बाबा आढाव हे 91 वर्षांचे तरुण नेतृत्व महाराष्ट्रात आहे, हे खरोखरच तुमचे भाग्य आहे, असेही पवार म्हणाले.
डॉ. बाबा आढाव यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, की शंकरराव घुले यांनी हमालांच्या उद्धारासाठी जीवन वेचले. त्यांनी हमालासाठी जे केले त्याचा आज गौरव झाला. या देशात घटनेचे राज्य आहे की धर्माचे हा खरा प्रश्न आहे. हा लढा साधा नाही. इंग्रजांना घालविणे सोपे होते; पण आज राजकारण वाईट झाले आहे. बाबासाहेबांच्या घटनेत सांगितले गेले त्याप्रमाणे न्याय आणि समान संधीसाठी सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. जनतेसाठी कल्याणकारी योजना आणण्यासाठी शेवटपर्यंत लढा देत राहील, तसेच लोकशाही वाचवण्यासाठी मी लढ्यामध्ये सामील होईल, असे ते म्हणाले.
स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप म्हणाले, की हमाल मापाडी, माथाडी, कामगार कष्टकरी वर्गाच्या अनेक समस्या आहेत. पण सामान्य माणसाचे ऐकून घेण्याची इच्छा सरकारची नाही, कामगार कायदा मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. सरकार कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करायला तयार नाही, अशी टीका त्यांनी केली. शंकरराव घुले यांचा वारसा नगरसेवक अविनाश घुले सक्षमपणे चालवत आहे. कष्टकर्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामगार चळवळ उभी राहणे गरजेचे आहे.
पोपटराव पवार यांचेही भाषण झाले. त्यांनी शंकरराव घुले यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडला. दरम्यान, अविनाश घुले व प्रा. गणेश भगत संपादित लोकनेते शंकरराव घुले यांचा चरित्रग्रंथ ‘संघर्ष गाथा’चे आणि हमालांच्या संदर्भात प्रा.गणेश भगत यांचा काव्यसंग्रह ‘मी तो भारवाही’ यांचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. शंकरराव घुले यांचा पुतळा साकारणारे प्रसिद्ध चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे, विकास कांबळे यांचा, तसेच कामगार आयुक्त पवळे यांचा विशेष सत्कार झाला. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. संजय महापुरे यांनी आभार मानले.
यापुढेही हे काम सुरू राहील : अविनाश घुले
हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले म्हणाले, हमाल मापाडी कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली तर हमाल संरक्षित होईल. माथाडी मंडळ जर सक्षम झाले तरच कामगारांचे प्रश्न सुटतील. माथाडी कायदा वाचला पाहिजे पण शिंदे फडणवीस सरकार, भाजप हा कायदा बुडविण्याच्या मागे आहे. ते आम्ही कदापि होऊ देणार नाही.