तरुणांना मिळेल जर्मनीत नोकऱ्यांची संधी, करारासाठी जर्मन उत्सुक – केसरकर
मुंबई: कौशल्य विकास, शिक्षण, पर्यटन व सांस्कृतिक देवाण-घेवाण याबाबत महाराष्ट्राशी तातडीने सामंजस्य करार करण्यास जर्मनीतील बाडेन-वूटॅमबर्ग राज्य सरकार उत्सुक आहे.
त्याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो तरुणांना होईल आणि त्यांना जर्मनीत नोकऱ्यांची संधी मिळेल, अशी माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत.
केसरकर यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण, पर्यटनाला चालना, जर्मन भाषा शिक्षण या विषयांवर १५ व १६ मे रोजी तीन बैठकांमध्ये विविध मुद्दे मार्गी लावले. त्यातील चर्चेचे फलित म्हणून महाराष्ट्र व बाडेन- वर्टेमबर्ग राज्यांमध्ये लवकरच सामंजस्य करार केला जाईल. त्यासाठी बाडेन-वूटॅमबर्गच्या सरकारने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना रीतसर आमंत्रित केले आहे. बाडेन-वूटॅमबर्ग जर्मनीतील सर्वांत संपन्न, औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले राज्य आहे. त्याच्याशी महाराष्ट्राचे दीर्घ काळापासून संबंध आहेत. ते आता अधिक दृढ होतील, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.
स्टुटगार्टमध्ये रविवारी केसरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची बाडेन-वूटॅमबर्ग राज्य सरकारशी बैठक झाली. त्यास स्टेट मिनिस्टर डॉ. फ्लोरियान स्टेकमन, राज्याच्या शिक्षणमंत्री थेरेसा शॉपर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यात विविध धोरणांवर चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये कृतिदल सुरू करून, कौशल्य विकास, पर्यटन, शिक्षण, सांस्कृतिक देवाण-घेवाण याबाबतचे करार केले जाईल. त्यातून नोकरीची संधी मिळेल, असे मंत्री केसरकर म्हणाले. स्टुटगार्ट व कार्ल्सरूह येथील बैठकांना भारताचे महावाणिज्य दूत मोहित यादव, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण खात्याचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल उपस्थित होते.