पुण्यात इन्कोव्हॅक लसीला अत्यल्प प्रतिसाद
पुणे : नाकावाटे देण्यात येणार्या भारत बायोटेकच्या इन्कोव्हॅक लसीला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. सध्या 60 वर्षांपुढील व्यक्तींसाठी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरात एप्रिलपासून केवळ 8 ते 10 जणांनी लस घेतली आहे. महापालिकेकडे सध्या 500 डोस उपलब्ध आहेत. नाकावाटे देण्यात येणारी इन्कोव्हॅक लस खासगी रुग्णालयांना 800 रुपयांना आणि शासकीय संस्थांना 325 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, 60 वर्षांवरील नागरिकांना कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीच्या दोन डोसनंतर सहा महिन्यांनी बुस्टर डोस म्हणून इन्कोव्हॅकचा डोस घेता येणार आहे. शहरातील बहुतांश नागरिकांचा पहिला डोस घेऊन झाला आहे, तर 85 टक्के नागरिकांना दुसरा डोस घेऊन झाला आहे. आतापर्यंत केवळ 10 ते 12 टक्के नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. त्यामुळे बुस्टर डोससाठी नाकावाटे देण्यात येणा-या लसीलाही अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.
राज्यात काय चित्र ?
शासनाने नाकावाटे देण्यात येणा-या इन्कोव्हॅक लसीचे 20 हजार डोस खरेदी केले. मात्र, आतापर्यंत केवळ 320 नागरिकांनीच लस घेतली आहे. 36 जिल्ह्यांपैकी 27 जिल्ह्यांमधील नागरिकांनी लसीकडे पाठ फिरवली आहे.
शहरात कमला नेहरू रुग्णालय, सुतार दवाखाना, बोपोडीमधील खेडेकर दवाखाना, दळवी रुग्णालय आणि हडपसरमधील अण्णासाहेब मगर रुग्णालयत या पाच ठिकाणी इन्कोव्हॅक लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ 8 ते 10 नागरिकांनीच लस घेतली आहे. कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन घेतलेल्या 60 वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस म्हणून इन्कोव्हॅक लस घेता येणार आहे.
– डॉ. सूर्यकांत देवकर,
सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका