नागपुरात ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून लूट, मुंबई, पुण्यासाठी दुपटीवर भाडेवाढ
नागपूर: उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने सुट्यांमध्ये अनेक जण कुठेतरी पर्यटनाचा किंवा गावी जाण्याचा बेत आखत असतात. त्यात अनेक पालक आपल्या मुलांसोबत पर्यटनाचा आनंद घेतात.त्यामुळे उन्हाळ्यात राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या बस आणि रेल्वे गाड्यांना गर्दी दिसत आहे. मात्र, याचा आणखी एक फटका प्रवाशांना बसत असल्याचे समोर आले आहे. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांची लूट करताना दिसत आहेत. ट्रॅव्हल्स कंपन्यांची उन्हाळी लूट सुरू आहे.
नागपूरहून मुंबई, पुण्यासाठी दुप्पटीवर भाडेवाढ केल्याचे दिसत आहे. प्रवाश्यांची गर्दी वाढल्याने ट्रॅव्हल्स मालकांनी सर्वच मार्गावर दुप्पट भाडेवाढ केली आहे. ट्रॅव्हल्स मालकांचा मनमानी कारभार सुरू असून प्रवाशांची लूट केली जात आहे. खासगी बस वाहतूकदारांनी प्रवाशांकडून किती भाडे आकारावेत याबाबत नियम ठरले असताना देखील या नियमांना मोडीत काढत प्रवाशांची लूट सुरू असल्याचे चित्र आहे.
यामुळे भाडेवाढ केल्याने बाहेरगावी जाण्याचा बेत आखणाऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. म्हणून नियमानुसार भाडेवाढ करण्याची मागणी केली जात आहे. सध्या बस आणि रेल्वेला होणारी गर्दी पहाता, खासगी बसेसकडून प्रवास भाड्यात अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आली आहे. मात्र, सध्या लालपरी आणि रेल्वेला होणारी गर्दी पहाता अनेकांकडे केवळ खासगी बसेसचा पर्याय शिल्लक आहे. म्हणून त्या लोकांना अव्वाच्या सव्वा भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. या बसेसच्या भाडेवाढीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.