ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

आधी निर्णय पक्षाचा, त्यानंतर अपात्रतेचा; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर


मुंबई: आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यापूर्वी पक्ष कुणाचा, याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आमदारांच्या अपात्रतेच्या मागणीवर निर्णय घेतला जाणार आहे लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू केली जाईल. मात्र, कोणाच्या आरोपांना घाबरून निर्णय घेणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी स्पष्ट केले.

लंडन दौर्‍यावरून मुंबईत परतल्यावर माध्यमांशी बोलताना नार्वेकर म्हणाले, अपात्रतेबाबत निर्णय घेताना कोणतीही घाई करणार नाही. तसेच विनाकारण विलंबही करणार नाही. या प्रक्रियेला जितका वेळ लागेल तोच यासंदर्भातील योग्य कालावधी (रिझनेबल टाईम) आहे. आमदार अपात्रतेबाबत नियम, घटनेतील तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे निर्णय घेतला जाईल. अपात्रतेबद्दल ज्या याचिका दाखल झाल्या आहेत, त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. मात्र, ही मोठी प्रक्रिया आहे.

सर्वप्रथम या प्रकरणात राजकीय पक्ष कोणाचा आहे, याचा निर्णय करावा लागणार असल्याचे नार्वेकरांनी सांगितले. शिवसेना कोणाची, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा सद्य:स्थितीवर होता. तथापि, आमच्याकडील प्रकरणात तो पूर्वलक्षी प्रभावाने घ्यावा लागणार आहे. त्यावेळी भरत गोगावले किंवा सुनील प्रभू हे कोणाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांचा राजकीय पक्ष नेमका कोणता, हे निश्चित करून पुढील प्रक्रिया सुरू होईल, असेही ते म्हणाले. अध्यक्ष म्हणून माझे काय अधिकार आहेत, याची मला माहिती आहे आणि ते कसे बजावायचे हेही मला ठाऊक आहे, असेही ते म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button