पाळणा हलला तरी मिळेनात लग्नाचे पैसे; दोन वर्षे प्रतीक्षाच!
नागपूर : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना समाजकल्याण विभागाकडून ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. मात्र, नागपूर जिल्हयात जोडप्यांना मागील दोन वर्षात पैसे मिळालेले नाही. पैसे कधी मिळणार हेही स्पष्ट नसल्याने अर्जधारक जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.
२०२१ पासून निधीची कमतरता आहे. त्यामुळे प्रकरणे प्रलंबित आहे. यातील अनेकांचे पाळणे हलले. मात्र, त्यांना अद्याप हे अनुदान मिळालेले नाही.राज्य सरकारकडून दरवर्षी अनुदान प्राप्त होणे अपेक्षित आहे. परंतु निधी मिळत नसल्याने लाभार्थी जोडप्यांना पैशासाठी समाजकल्याण कार्यालयाच्या चकरा मारावया लागतात. सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यत पोहचावा, त्याचा लाभ लाभार्थींना होणे गरजेचे आहे. लाभार्थी जोडप्यांची गैरसोय टाळण्यासाठी समाज कल्याण कार्यालयाने याबाबतची माहिती जाहीर करणे आवश्यक आहे. निधी कधी मिळणार हे स्पष्ट असले तर लाभार्थींना विनाकारण चकरा माराव्या लागणार नाही.
३ कोटी ७५ लाखांची गरज
नागपूर जिल्ह्यातील ७७५ प्रकरणांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. यापूर्वी अखेरचे अनुदान सप्टेंबर २०२२ मध्ये ५६ लाख रुपये प्राप्त झाले होते. त्यातून २६ ऑक्टोबर २०२० पर्यंतच्या ११३ लाभार्थ्यांना अनुदान दिले गेले. २७ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२३ या अडीच वर्षांतील ७७५ प्रकरणे प्रलंबित आहे.यासाठी ३ कोटी ७५ लाखांच्या अनुदानाची प्रतिक्षा आहे.