देशात एप्रिलअखेर 320 लाख टन साखर उत्पादन
पुणे: देशात 531 साखर कारखान्यांमध्ये 30 एप्रिलअखेर 320 लाख 30 हजार टन इतके साखरेचे उत्पादन तयार झाले आहे. तर, मे महिनाअखेर हंगाम चालण्याची अपेक्षा असून, हंगामअखेर एकूण 327 लाख 35 हजार टन साखर तयार होण्याची अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.
साखरेव्यतिरिक्त सुमारे 45 लाख टन साखरेचा वापर इथेनॉल उत्पादनाकडे वळविण्यात येत असल्याचे नमूद करून त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात व तामिळनाडू या पाच राज्यांनी आघाडी घेतली आहे. त्या खालोखाल हरियाणा, पंजाब आणि बिहारचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 105 लाख 30 हजार टन इतके साखरेचे उत्पादन तयार झालेले आहे. देशातील 30 एप्रिलअखेरची स्थिती पाहिली, तर 531 साखर कारखान्यांपैकी 67 कारखान्यांत अजूनही ऊस गाळप सुरू आहे.
देशात सर्वाधिक सरासरी साखर उतारा गुजरात 10.80 टक्के, कर्नाटक 10.10 टक्के, तेलंगण 10.10 टक्के, महाराष्ट्र 10 टक्के, आंध- प्रदेश 9.70 टक्के, बिहार 9.70 टक्के व उत्तर प्रदेशमधील उतारा 9.65 टक्के आहे. या कालावधीत उसाचे सर्वाधिक गाळप उत्तर प्रदेशात झाले असून, ते 1055.96 लाख टन आहे. त्याखालोखाल महाराष्ट्र 1053 लाख टन व कर्नाटकात 549.50 लाख टन इतके ऊसगाळप पूर्ण झाले आहे.