पुण्यातील विमान प्रवाशांची लवकरच गर्दीतून सुटका
पुणे:पुणे विमानतळावर मागील काही काळापासून प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या गर्दीमुळे अनेक पायाभूत सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र आहे. यामुळे प्रवासी वारंवार तक्रारी करताना दिसतात.
लवकरच प्रवाशांची ही गैरसोय बंद होणार आहे. कारण पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले आहे. ते सप्टेंबरपासून कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनलचे काम पूर्ण होत आले आहे. हे टर्मिनल पूर्णपणे वातानुकूलित असणार आहे. त्यात प्रवाशांसाठी पाच पादचारी पूल असतील. याचबरोबर ३४ चेक-इन काऊंटर असतील. तसेच, बॅगांसाठी इन-लाईन बॅगेल हँडलिंग सिस्टिम असेल. या टर्मिनलमध्ये २७ हजार चौरस फुटांमध्ये पादचारी उड्डाणपूल आणि विक्री केंद्रांसोबत प्रवाशांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा असतील. नवीन टर्मिनल सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ४७५ कोटी रुपये आहे.
नवीन टर्मिनलच्या बांधकाम आणि विद्युतीकरणाचे काम ३० जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे. यानंतर जुलैमध्ये नवीन टर्मिनलची चाचणी सुरू होणार आहे. जुनी इमारत आणि नवीन इमारत एकमेकांशी जोडली जाणार आहे. पादचारी पुलांद्वारे या दोन्ही इमारती जोडल्या जातील. पुण्याचे सांस्कृतिक ओळख दाखवणारी ही नवीन इमारत असेल. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर विमानतळाची प्रवासी क्षमता जवळपास दुपटीने वाढणार आहे.
विमानतळावर एप्रिलमध्ये ७.६ लाख प्रवासी
पुणे विमानतळावर एप्रिलमध्ये ७ लाख ६६ हजार ४०२ प्रवाशांनी ये-जा केली. विमानतळावर आगमन आणि उड्डाण झालेल्या विमानांची संख्या ५ हजार ४७ आहे. याबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे की, पुणे हे आधुनिकता आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात हे शहर पुढे वाटचाल करीत आहे. ऐतिहासिक, धार्मिक स्थळे आणि महत्त्वाच्या कार्यालयांमुळे पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.