कागदी तिकीटाला लवकरच रामराम! रेल्वे टाकणार हे मोठे पाऊल
रेल्वे खातं लवकरच प्रिटेंड रेल्वे तिकीट बंद करण्याची दाट शक्यता आहे. कारण रेल्वेने तिकीट छापाई होणाऱ्या प्रिटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वेची तिकीट प्रक्रिया संपूर्णपणे डिजिटल होण्याची दाट शक्यता आहे.
पण लागलीच हे काम होईल, असे नाही. त्यासाठी काही वेळ लागेल. पण ही प्रक्रिया सुरु होणार हे नक्की. तसेच तिकीट छपाईचे कंत्राट एखाद्या खासगी कंपनीला, ठेकेदाराला पण देण्यात येऊ शकते.
खासगी क्षेत्राच्या हातात
2017 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी याविषयीचे संकेत दिले होते. त्यानुसार, सरकार तिकीट प्रिटिंगचे काम तिसऱ्या व्यक्तीच्या, कंपनीच्या हातात देऊ शकते. रेल्वे विभागाकडे एकूण 14 प्रिटिंग प्रेस होत्या. त्यापैकी 9 प्रिटिंग प्रेस बंद करण्यात आल्या आहेत. आता रेल्वेकडे 5 प्रिटिंग प्रेस उरल्या आहेत. त्या पण आता बंद करण्यात येणार आहे.
या प्रिटिंग प्रेसला टाळे
रेल्वे बोर्डाने झोनल रेल्वेला याविषयीचा आदेश दिला. बोर्ड अधिकाऱ्यानुसार, मुंबईतील भायखळा, कोलकत्ता जवळील हावडा, दिल्ली शकुरबस्ती, चेन्नईतील रोयापूर आणि सिंकदराबाद येथील सध्याच्या रेल्वे प्रिटिंग प्रेसला टाळे लावण्यात येणार आहे. याठिकाणी रिझर्व्ह आणि जनरल अशा दोन्ही प्रकारची तिकीटे छापण्यात येतात. तसेच रोख पावती आणि 46 प्रकारची मनी वॅल्यूची येथे छपाई करण्यात येते. प्रिटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय 2019 मध्ये घेण्यात आला होता.
ऑनलाईन तिकीटाच्या विक्रीत वाढ
रेल्वे आता तिकीट पूर्णतः डिजिटल करण्याच्या तयारीत आहे. त्या मार्गावर रेल्वे एकएक पाऊल टाकत आहे. एका वृत्तानुसार, सध्या केवळ 19 टक्के तिकीट काऊंटरवरुन खरेदी करण्यात येत आहे. तर 81 टक्के तिकीटांची विक्री ही ऑनलाईन पद्धतीने होत आहे. ही संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे तिकीटाची डिजिटलीकरण करण्याची शक्यता आहे.