प्रेमसंबंधांमुळे रक्ताचे डाग पडल्याचा भावाला संशय, पहिल्यांदाच पाळी आलेल्या बहिणीचा खून
पहिल्यांदा मासिक पाळी येण्याचा प्रसंग प्रत्येक पौगंडावस्थेतील मुलीला संमिश्र अनुभव देत असतो. शरीर आणि मनाच्या बदलांना ती मुलगी प्रथमच सामोरी जात असते. पण, हाच अनुभव एका दुर्दैवी मुलीच्या जिवावर बेतला आहे.
आपल्या बहिणीचे प्रेमसंबंध असल्याच्या गैरसमज होऊन एका 30 वर्षांच्या भावाने आपल्या 12 वर्षांच्या बहिणीची हत्या केली आहे.
हा धक्कादायक प्रकार उल्हासनगर येथे घडला. नेहा (बदललेले नाव) ही तिचा मोठा भाऊ आणि वहिनीसोबत उल्हासनगर येथे राहते. तिचा भाऊ रमेश (नाव बदललेले) हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी या मुलीला पहिल्यांदा पाळी आली. रमेशने तिच्या कपड्यांना लागलेले रक्ताचे डाग पाहिले आणि त्याला तिच्यावर संशय आला.
नेहाचं प्रेमप्रकरण असावं आणि त्यातून तिचे शरीरसंबंध निर्माण झाले असावेत, या संशयाने रमेशला पछाडलं. त्याने तिच्याकडे कडक शब्दांत याबद्दल विचारणा केली. त्यावेळी मासिक पाळीच्या चक्राविषयी संपूर्णतः अनभिज्ञ असलेल्या नेहाला याविषयी काहीही सांगता आलं नाही. त्यामुळे रमेशचा संशय बळावला.
त्याने रागाच्या भरात तिला गरम चिमट्यांनी चटके दिले. त्यामुळे ती गंभीररित्या भाजली. तिला उल्हासनगर येतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिला दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तिच्या चेहऱ्यावर, पाठीवर आणि शरीरावर अनेक ठिकाणी भाजल्याच्या खुणा होत्या. पोलिसांनी रमेशवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. नेहाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.