फक्त 436 रुपयात दोन लाखांचा विमा; केंद्र सरकारची ही भन्नाट पॉलिसी
नवी दिल्ली:केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना लागू करण्यात आल्या आहेत. अनेक योजनांची माहिती फार कमी नागरिकांना मिळते. देशातील सामान्य नागरिकांसाठी एक योजना सरकारने सुरू केली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana) ही अशीच एक योजना आहे. ही विमा पॉलिसी अतिशय माफक दरात खरेदी करता येते. या योजनेची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली होती.
दोन लाख रुपयांचा विमा
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत, पॉलिसी घेणार्या व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास नॉमिनीला दोन लाख रुपयांपर्यंतचा विमा दावा मिळतो. जीवन ज्योती विमा पॉलिसी 18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्ती खरेदी करू शकतात. पॉलिसी खरेदी केल्याच्या 45 दिवसानंतर विमा योजनेत कव्हर लागू होईल,
वर्षाला किती प्रीमियम?
जीवन ज्योती विमा योजनेची पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्हाला दरवर्षी 436 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल. वर्ष 2022 पूर्वी ही रक्कम 330 रुपये इतकी होती. त्यानंतर आता ही रक्कम 436 रुपये करण्यात आली आहे. या विमा पॉलिसीचा प्रीमियम एक जून ते 30 मे पर्यंत तुम्ही प्रीमियम भरू शकता.
ही विमा योजना खरेदी करणे सोपं आहे. कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन अथवा नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही पॉलिसी खरेदी करू शकता.
टर्म इन्श्युरन्स प्लान (Term Insurance Plan)
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही केंद्र सरकारची टर्म इन्श्युरन्स प्लान आहे. टर्म इन्श्युरन्स म्हणजे विमा पॉलिसी वैध असताना पॉलिसीधारकाचे निधन झाल्यास विमा कंपनी विम्याची रक्कम अदा करते. जर, पॉलिसीधारक विमा योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही हयात असल्यास त्यांना कोणताही लाभ मिळत नाही.
ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद
जीवन ज्योती विमा योजनेतंर्गत आतापर्यंत 16.19 कोटी अकाउंट कव्हर झाले आहेत. तर, 13,290.40 रुपये हे विमा दाव्याच्यानिमित्ताने देण्यात आले आहेत. या योजनेच्या लाभार्थीमध्ये 52 टक्के महिला आहेत. पॉलिसीधारकांमध्ये 72 टक्के लोक हे ग्रामीण भागातील आहेत.
आधार-पॅन कार्डची आवश्यकता
जीवन ज्योती विमा योजना खरेदी करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, बँक पासबुक आणि मोबाइल क्रमांकाची आवश्यकता आहे.