ताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर जिल्ह्यातील साडेचार हजार शेतरस्ते झाले अतिक्रमणमुक्त !


लातूर : शेतात जाण्यासाठी रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. त्यात पुर्वीच्या असलेल्या रस्त्यावरही अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले होते.
परिणामी, शेतरस्त्यामुळे शेतमाल घरी नेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ५८५ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये गाव नकाशावरील नोंद असलेल्या ४ हजार ९८० शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. महाराजस्व अभियानातंर्गत ३० एप्रिलपर्यंत त्यापैकी ४ हजार ५८५ रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. गाव नकाशावर नोंद नसलेल्या १ हजार ९३ शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. ३० एप्रिलपर्यंत यापैकी ९७१ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. उर्वरित रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरु असून त्यांनाही गती देण्यात आली आहे.

अनेकदा शेतातील रस्त्यावरुन भावकीमध्ये वाद होतात. ही प्रकरणे तहसील तसेच न्यायालयापर्यंत जातात. तोपर्यंत शेतकऱ्यांना पर्यायी मार्ग शोधावा लागतो. मात्र, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी १ मे पर्यंत जिल्ह्यातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जवळपास ४ हजार ५८५ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मदत होणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित अतिक्रमणमुक्त शेतरस्ते लवकरात लवकर मोकळे करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

नोंद नसलेले रस्तेही अतिक्रमणमुक्त…
जिल्ह्यात गाव नकाशावर नोंद नसलेल्या १ हजार ९३ शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. ३० एप्रिलपर्यंत यापैकी ९७१ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. महसूल विभागाकडून गावा-गावातील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या अतिक्रमणमुक्त रस्त्यांवर शेतकरी मुरुम टाकून मजबुतीकरण करीत आहे. परिणामी, पावसाळ्यातही शेतापर्यंत जाण्यासाठी सोय होणार आहे.

महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी…
महाराजस्व अभियानांतर्गत शेतरस्ते, अतिक्रमणमुक्त रस्ते मोकळे करण्यासाठी योजना राबविली जात आहे. अनेक शेतकरी शेतरस्त्याचे प्रश्न घेऊन तहसील, जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करीत होते. मात्र, या अभियानाला प्रत्यक्ष गती मिळाल्याने बहूतांश रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button