अंगात खाकी वर्दी घालून लाच घेणारा पोलिस अधिकारी नाशिकमध्ये जाळ्यात
नाशिक : अंगात खाकी वर्दी अन् कमरेला सरकारी रिव्हॉल्वर लावून सहायक पोलिस निरीक्षक संशयित सागर गंगाराम डगळे (३८) याने सात हजार रुपयांची लाच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात स्वीकारली.
यावेळी संशयित लाचखोर पोलिस अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिताफीने बुधवारी संध्याकाळी रंगेहाथ ताब्यात घेतले.
गुन्ह्याच्या तपासाकरिता पुण्याला जाण्यासाठी खासगी वाहन व जेवण खर्चासाठी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाचेची मागणी डगळे यांनी केली होती. तडजोडअंती सात हजार रुपयांची लाच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात बुधवारी (दि.३) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून त्यांनी स्वीकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक अनिल बागुल, किरण अहिरराव, अजय गरुड यांच्या पथकाने त्यांना पंचांसमक्ष ताब्यात घेतले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठ वालावलकर यांच्या आदेशान्वये सरकारवाडा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयात साध्या गणवेशातील पोलिसांनी अचानकपणे खाकी वर्दीतील पोलिस अधिकाऱ्याला ताब्यात घेत सरकारी वाहनाकडे घेऊन जाताना बघ्यांची गर्दी झाली होती. या कारवाईने संध्याकाळी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली.
वर्षभरापूर्वीच मिळाली पदोन्नती!
संशयित डगळे यांना गेल्यावर्षीच सहायक निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बदल्यांमध्ये विशेष सुरक्षा विभागाच्या निवड यादीतसुद्धा डगळे यांचे नाव आले होते; मात्र नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले नसल्याने ते उपनगर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होते.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.