बीडमध्ये 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग; पुतण्याने काकांना दिला धोबीपछाड
बीड:राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसला असून अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.अशातच बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अतिशय धक्कादायक निकाल समोर आला आहे. बीडमधल्या बाजार समितीच्या निवडणुकीत मुंडे बहिण-भाऊ आमनेसामने सामने असल्याने सर्वांचेच लक्ष्य या निकालाकडे लागले होते. दुसरीकडे मात्र बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी (Sandeep Kshirsagar) काका जयदत्त क्षीरसागरांच्या (Jaydutt Kshirsagar) चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावलाय.
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी पाच पक्षांची मोट बांधून काका जयदत्त क्षीरसागरांविरोधात दंड थोपटले होते. आज कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आला अन् जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला आहे. संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागरांना धोबीपछाड दिला आहे. या विजयानंतर संदीप क्षीरसागर यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलाय. मागील 40 वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची एक हाती सत्ता होती. ही निवडणूक मात्र प्रतिष्ठेची बनवून आमदार संदीप क्षीरसागर हे शिंदे गट, ठाकरे गट, भाजपा, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी पक्षाची मोट बांधून निवडणुकीला सामोरे गेले होते. आता आलेल्या निकालावरुन संदीप क्षीरसागर यांनी काकांना निवडणुकीमध्ये चितपट केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे.