राहुल गांधी यांनी बदलला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा फैसला
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी दिल्ली व पंजाबच्या नेत्यांच्या सल्ल्यावरून आम आदमी पार्टीबाबत कठोर भूमिका कायम ठेवून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फैसला बदलला आहे. सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते तेव्हा खरगे यांनी त्यांना फोन करून पाठिंबा दिला होता.
विरोधकांच्या ऐक्याच्या नावावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर समर्थन करू नये, असे दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजय माकन व पंजाब विधिमंडळ पक्षाचे नेते प्रताप सिंह बाजवा यांना वाटत होते. याचमुळे माकन यांना विरोध केला. तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दिल्लीचे प्रभारी शक्तिसिंह गोहील म्हणाले की, हे अजय माकन यांचे व्यक्तिगत विचार आहेत. त्यानंतर माकन यांना प्रताप सिंह बाजवा यांचा पाठिंबा मिळाला.
बाजवा व माकन यांनी राहुल गांधी यांच्यासमोर तथ्ये ठेवताना सांगितले की, पंजाब व दिल्ली या दोन्ही राज्यांत काँग्रेसची व्होट बँक फोडणारे अरविंद केजरीवाल हेच आहेत. आपण आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला तर या दोन्ही राज्यांत जे कार्यकर्ते काँग्रेसकडे आहेत ते पक्ष सोडून देतील.
राहुल गांधी यांना हेही सांगण्यात आले की, सोनिया गांधी व राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली तेव्हा केजरीवाल यांनी पाठिंबा दिला होता का? या दोन्ही नेत्यांचे म्हणणे ऐकल्यावर राहुल गांधी यांनी शक्तिसिंह गोहील यांना फटकारले व जालंधर पोटनिवडणुकीसाठी दिल्लीच्या अल्पसंख्याक नेत्यांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले. अजय माकन यांनी याबाबतची मोहीम सुरू ठेवत केजरीवाल यांच्या निवासस्थानावर ४५ कोटींच्या खर्चाच्या मुद्द्यावर खुलेपणाने आपले मत मांडले.
केजरीवाल यांना दिला हाेता पाठिंबा
खरगे यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या नावावर दारू घोटाळ्यात केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता. सीबीआयने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले, त्यानंतर लगेच खरगे फोन करून म्हणाले होते की, आम्ही तुमच्यासोबत आहोत. मोदी सरकार बदल्याच्या भावनेने काम करीत आहे. त्यानंतर दिल्ली व पंजाब काँग्रेसने यावर आक्षेप नोंदवला होता.