अमित शाह पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर; नेतृत्व बदलांच्या चर्चांना उधाण
मुंबई:राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच भाजपच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झालं आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातील दौरे वाढल्याचे दिसून येत आहे. अमित शहा पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर असणार आहेत.
महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलेच तापलेलं दिसत आहे. कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून वाद, जोडे प्रकल्पावरून वाद सुरू असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा होताना दिसत आहेत. यादरम्यानच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत असून नेतृत्व बदलांच्या चर्चांना उधान आलं आहे.
2 दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह नागपूर दौऱ्यावर येणार होते. मात्र, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रीय दुखवटा असल्यानं त्यांनी तो दौरा रद्द केला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या मुंबई दौऱ्यावरून तर्क-वितर्क वर्तवले जात आहेत. यावेळी कोणती राजकीय चर्चा होईल का यावर अजूनही काही माहिती समोर आलेली नाही.
दोन आठवड्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर आता अमित शहांचा एप्रिल महिन्यांतील हा दुसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे. मात्र अमित शाह हे त्यांच्या एका नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी मुंबई दौऱ्यावर येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अमित शाहांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून या दौऱ्यानंतर येत्या काळात काही नवीन राजकीय घडामोडी घडणार का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
अशातच राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात अनेक घडामोडी घडत असतानाच अमित शाह यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे