घटस्फोटित महिलेचे शोषण, लग्नास नकार; गुन्हा दाखल
अमरावती : लग्नाचे आमिष देत एका घटस्फोटित महिलेचे सुमारे सव्वा तीन वर्षे लैंगिक शोषण करण्यात आले.
फेब्रुवारी २०२० ते एप्रिल २०२३ दरम्यान ती छळमालिका चालली. याप्रकरणी पिडिताच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी २७ एप्रिल रोजी आरोपी गौरव अशोक राऊत (३१, शिवशक्तीनगर) याच्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, फिर्यादी महिलेचे सन २०१४ मध्ये विवाह झाला. मात्र तिच्या पतीला लकवा गेल्याने सन २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दरम्यान त्यानंतर ती आईकडे माहेरी राहायला आली. ती अमरावतीत राहून ग्रंथालयात अभ्यासाकरीता जायची. तेथे अभ्यासासाठी येत असलेल्या आरोपी गौरवसोबत तिची ओळख झाली. त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या.
फेब्रुवारी २०२० च्या सुमारास त्याने तिला विश्वासात घेऊन स्वत:च्या घरी नेले. तेथे तिच्या इच्छेविरूद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढे तिने लग्नाचा तगादा लावला. त्याने होकार भरत वारंवार तिचे सर्वस्व लुटले. दरम्यान, २७ एप्रिल रोजी रात्री तिने पुन्हा एकदा त्याला लग्न करण्याबाबत विचारले. मात्र यापुर्वी गोड बोलून लग्नाचे आमिष दाखविणाऱ्या गौरव राऊतने थेट लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने गुरूवारी रात्रीच्या सुमारास राजापेठ पोलीस ठाणे गाठले. तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिचे बयाण नोंदवून घेत रात्री १० च्या सुमारास गुन्हा दाखल केला.