मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच!; नागपुरात झळकले पोस्टर्स
नागपूर:विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वतः 2024 कशाला आता देखील… असे म्हणत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यानंतर ते भाजपसोबत जाणार काय, अशी चर्चा रंगली आहे असे असताना पुण्यानंतर आता नागपुरातही अजित पवार यांच्या समर्थनात बॅनरबाजी सुरु झाली आहे. या बॅनरवर ‘वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाचं पक्का’ असा मजकूर लिहिलेला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावले आहे.
नागपुरातील लक्ष्मीभवन चौक आणि इतर परिसरात हे बॅनर लावण्यात आले असले, तरी यात अजितदादांचाच फोटो नसल्याने ही चूक कुणाची? याचीही चर्चा रंगली आहे. काल बुटीबोरीत लागलेले देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर चर्चेत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सारे नागपुरात मुक्कामी असताना राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. पुण्यातील कार्यक्रमात, मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली होती. त्यानंतर पुण्यात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून बॅनरही झळकले होते.
अजित पवारांची सासुरवाडी धाराशीव जिल्ह्यत आहे. तेथेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. अशातच आता राज्याच्या उपराजधानीतही अजित पवार हेच ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर झळकले आहे. अर्थात हे बॅनर समर्थकांनी स्वतःहून लावल्याची चर्चा अधिक आहे. कारण त्या बॅनरवर कुठेही अजित पवारांचा फोटो नाही. त्यात शरद पवार, प्रफुल्ल पटेल व अनिल देशमुख या तीनच नेत्यांचे फोटो आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वतःच्या प्रचारासाठीच बॅनर्स लावल्याची चर्चा नागपुरातील राजकीय वर्तुळात आहे.