जिल्ह्यात २८ वाळू घाटांचे होणार लिलाव
जालना : राज्य शासनाच्या नवीन धोरणामुळे लांबणीवर पडलेल्या वाळू घाटांचा अखेर लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. या लिलाव प्रक्रियेत जिल्ह्यातील २८ वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत.
नवीन धोरणानुसार वाळू घाटातून उपसा केलेली वाळू ही जिल्ह्यात आठ वाळू डेपोच्या माध्यमातून विक्रीसाठी साठविली जाणार आहे. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेला किती प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्याच्या दरम्यान वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया जवळपास संपलेली असते. मात्र, यंदा राज्य शासनाच्या नवीन धोरणांमुळे जिल्ह्यातील वाळू घटांच्या लिलावाची प्रक्रिया लांबणीवर पडली. परिणामी एप्रिल महिना संपत आला तरी जिल्ह्यात एक ही अधिकृत वाळू घाट सुरू नाही.
तर दुसरीकडे शहरासह जिल्ह्यात नवीन बांधकामे जोरात सुरू असून या बांधकामांना घाट बंद असताना वाळूचा पुरवठा सुरूच आहे. जिल्ह्यातील गोदावरी, पूर्ण, दुधना, धामणा, सुकना, गल्हाटी, केळना, गिरिजा नद्यांसह सीना-कुंडलिका नदीपात्रातून वाळू उपलब्ध आहे. या नदीपात्रातून अवैध वाळू उपसा ही केला जात असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार अखेर जिल्ह्यातील २८ वाळू घाटांचा लिलाव होणार आहे. या २८ वाळू घाटांमधून वाळू उपसा करून तो वाळू डेपोमध्ये साठविला जाणार आहे. त्यामुळे वाळू घाटांसह वाळू डेपो व्यवस्थापनासाठी ही एजन्सी नेमली जाणार आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून यंदा मे महिन्यात जिल्ह्यातील नदीपात्रातून अधिकृत वाळू उपसा सुरू होण्याची शक्यता आहे.
या घाटांचा होणार लिलाव
जिल्ह्यातील २८ वाळू घाटांचा लिलाव होणार आहे. यामध्ये बदनापूर तालुक्यातील सायगाव, नानेगाव, जाफराबाद तालुक्यातील टाकळी, आरदखेडा-वरखेडा विरो, गारखेडा, पिंपळखुटा-देऊळगाव उगले, भोकरदन तालुक्यातील खडकी-बोरगाव खडक, पिंपळगाव सुळ, मेरखेडा, देऊळगाव तांडा, जवखेडा ठोंबरी, अंबड तालुक्यातील चांभारवाडी,
आपेगाव, पिठोरी सिरसगाव, हसनापूर, दाढेगाव, घनसावंगी तालुक्यातील रांजणी, मंठा तालुक्यातील देवठाणा-उस्वद-१, देवठाणा-उस्वद-२, देवठाणा-उस्वद-खोरवड, कानडी-उस्वद, भुवन-शिरपूर, वाघाळा-भुवन-पोखरी (कें.), किर्ला-वाघाळा, किर्ला-टाकळखोपा, दुधा-टाकळखोपा, कानडी-लिंबखेडा, इंचा-सासखेडा या २८ वाळू घाटांचा लिलाव होणार आहेत.
हे आहेत आठ वाळू डेपो
वाळू घाटांमधून वाळू उपसा केल्यानंतर तो थेट विक्री न करताना वाळू डेपोमध्ये जमा करणे आहे. यासाठी जिल्ह्यात आठ वाळू डेपो तयार करण्यात आले आहे. यामध्ये बदनापूर तालुक्यातील सायगाव-डोंगरगाव, जाफराबाद तालुक्यातील सावरखेडा, भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, अंबड तालुक्यातील आपेगाव, पिठोरी सिरसगाव, घनसावंगी तालुक्यातील रांजणी, मंठा तालुक्यातील तळणी आणि मंठा तालुक्यातील सासखेडा या आठ ठिकाणी वाळू डेपो तयार केले जाणार आहेत.
जिल्ह्यातील २८ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया सुरू झाला आहे. या २८ वाळू घाटांमधून वाळू उपसा करून ते जिल्ह्यातील आठ डेपोमध्ये साठविली जाणार आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार वाळू डेपोमधूनच नागरिकांना वाळू विक्री होणार आहे. थेट घाटातून नागरिकांना वाळू विक्री होणार नाही.
-अंकुश पिनाटे, अप्पर जिल्हाधिकारी, जालना