ताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुणीभांडी करणाऱ्या मातेची लेक पुणे पोलिस दलात प्रथम


नाशिक:नियतीच्या या परीक्षेत जो स्वतःला झोकून देत आलेल्या प्रसंगाशी दोन हात करतो तेव्हा नियतीलाही त्या जिद्दीपुढे हात टेकावे लागतात, अशीच काहीशी प्रचिती ओझरकरांना अनुभवायला मिळाली.
लोकांच्या घरी जाऊन धुणी-भांडी करणाऱ्या एका मातेच्या कष्टाची जाणीव ठेवून अपूर्वा वाकोडे पोलिस भरतीसाठी उतरली आणि नुसतीच पास झाली नाही तर पुणे शहर पोलिस दलात ती मुलींमध्ये प्रथम आली.

ओझर येथील मरिमाता गेट येथे पत्र्याच्या कौलारू घरात राहणारी अपूर्वा वाकोडे हिची नुकत्याच झालेल्या पोलिस भरती परीक्षेत पुणे शहर पोलिस दलात निवड झाली आहे. तिने पुणे शहर पोलिस दलात मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान तिने पटकावला आहे. अपूर्वाला पोलिस भरतीसाठी तिचे बाबा रामदास गांगुर्डे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले आहे.

अपूर्वाचा ज्या दिवशी पोलिस भरतीचा लेखी पेपर होता त्याच दिवशी तिचे वडील नाशिक येथील एका हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. टेलर काम करणारे राजू वाकोडे यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता; तरी अपूर्वाने जिद्द न सोडता अश्रूंना डोळ्यात साठवून लेखी परीक्षा दिली. पेपर देऊन संध्याकाळी घरी पोहोचताच वडिलांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यामुळे मुलीचे हे यश पाहण्याचे सुख ते पाहू शकले नाहीत.

गरीब परिस्थितीला कधीही दोष न देता अपूर्वाने तिच्या आईला शेतातील कामासह घरकामात मदत करून हे यश संपादन केले. प्रेरणादायी यश संपादन केल्याबद्दल अनेक समाजसेवी संघटना, ज्ञानेश्वरी अभ्यासिका मित्र परिवार व निफाड भाजप विधानसभा प्रमुख यतीन कदम यांच्यातर्फे अपूर्वाचा सत्कार करण्यात आला.

बार्टीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा फायदा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या शैक्षणिक संस्थेच्या नाशिक येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या लेखी परीक्षेचा अपूर्वाला फायदा झाला आहे. एप्रिल ते जुलै २०२२ दरम्यान तिने चार महिन्यांचे शिकवणी तास पूर्ण केले. या दरम्यान तिला शिष्यवृत्तीदेखील मिळाली होती.

पोलिस वाहनचालक पदावर झाली निवड
के. व्ही. एन. नाईक कॉलेजमध्ये ४५ दिवस प्रशिक्षण पूर्ण केले. महिंद्रा फायनान्स संस्थेतर्फे आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त १००० भरून घेण्यात येणारा मोटार ड्रायव्हिंग क्लास अपूर्वाने पूर्ण केला होता. क्लास पूर्ण झाल्यावर १००० रुपये परत मिळाले होते. याच प्रशिक्षणाचा तिने फायदा घेत पोलिस वाहनचालक या पदासाठी फॉर्म भरला होता. या भरती प्रक्रियेदरम्यान तिने बोलेरो, सुमो यासारख्या छोट्या वाहनांसोबत पोलिस बस व पोलिस टेम्पो ट्रॅव्हलर यासारखे मोठे वाहन चालवून दाखवत यश संपादन केले.

मला मिळालेल्या यशात आई-वडील, भाऊ यांचा मोठा वाटा आहे. २०१८ ते २०२३ अशा ६ वर्षांच्या मेहनतीनंतर मला हे यश मिळाले. माझे बाबा म्हणजेच रामदास गांगुर्डे यांच्याकडून सतत प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले. जिद्द, मेहनत, चिकाटी ठेवल्यानेच मी यशापर्यंत पोहोचले.

– अपूर्वा वाकोडे, पुणे शहर पोलिस, ओझर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button