त्या’ चार उमेदवारांबाबत उच्च न्यायालयात उद्या सुनावणी
पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ‘त्या’ चार उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्याच्या राज्याच्या पणन संचालकांच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.त्यावरील सुनावणी बुधवारी (दि.26) आहे. त्यामुळे सुनावणीतील निर्णयाकडे हवेली तालुक्यातील शेतकर्यांच्या नजरा लागल्या आहेत.
चंद्रकांत गोविंद वारघडे व रोहिदास दामोदर उंद्रे व इतर या दाव्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक, पुणे बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी, पणन सह संचालक आदींनाही याबाबतची माहिती कळविण्यात आली आहे.
पुणे बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळ कालावधीत समितीला 8 कोटी 66 लाख 50 हजार रुपयांइतका आर्थिक तोटा झाला आहे. चौकशी अहवालानुसार रक्कम भरणा केलेली नसल्यामुळे या समितीवरील तत्कालीन संचालक मंडळातील रोहिदास उंदरे, प्रकाश जगताप, दिलीप काळभोर व राजाराम कांचन यांना बाजार समितीच्या निवडणुकीत अपात्र करण्याची मागणी वारघडे यांनी पणन संचालकांकडे केली होती.
तसेच मुख्यमंत्री तथा पणनमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या अपिलावर ‘माझ्यासमोर पुढील सुनावणी होईपर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात येत आहे.’ असे आदेश आहेत. त्यावर वारघडे यांचे अपील पणन संचालकांनी नामंजूर केले. तसेच त्या चारही उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्याचा बाजार समितीच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांचा निर्णय कायम ठेवला होता. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.