ठाकरेंच्या सभेने जळगावमध्ये शिवसैनिकांना बळ
जळगाव : ज्या जिल्ह्यातील आपल्या पक्षाचे सर्व आमदार बंडखोर गटास जाऊन मिळाले, अशा जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेस कितपत प्रतिसाद मिळेल, हा बंडखोरांसह सर्वांच्या उत्सुकतेचा विषय होता.
पाचोऱ्यातील मैदान तुडूंब भरल्याने गर्दीचे समीकरण जुळून आले. सभेपूर्वीच शिंदे गटाकडून केले जाणारे दावे आणि त्यांना ठाकरे गटाकडून दिले जाणारे प्रत्युत्तर यामुळे सभा सुरळीत होते की नाही, अशी चिंता पोलिसांना होती. परंतु, सर्वकाही केवळ डरकाळ्यांवरच निभावल्याने सभा व्यवस्थित पार पडली. सभेत ना कोणी अनाहूतपणे घुसले, ना कोणी दगड फेकले.
राज्यातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री ठाकरे यांची जिल्ह्यातील ही पहिलीच सभा आणि उत्तर महाराष्ट्रातील मालेगावनंतर दुसरी सभा. ठाकरेंच्या उपस्थितीत जळगावातील पिंप्राळा उपनगरात शिवस्मारकाचे भूमिपूजन, पाचोऱ्यात शिवसेना नेते दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण, जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन आणि त्यानंतर जाहीर सभा झाली. ठाकरेंचा नियोजित दौरा दोन तास लांबला. उष्णतेच्या झळा व शासन आदेशाने ठाकरेंचे जळगावात विमान उतरण्यापूर्वीच पिंप्राळा उपनगरातील शिवस्मारकाचे भूमिपूजन खासदार संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत उरकण्यात आले. ठाकरे न आल्यामुळे पिंप्राळावासियांचा हिरमोड झाला. मात्र, दुपारी सव्वादोनच्या सुमारास ठाकरेंनी अवघ्या दोन मिनिटांच्या भेटीत संवाद साधत मी शिवस्मारकाच्या अनावरणासाठी तीन महिन्यांनंतर पुन्हा येईन, अशी ग्वाही दिली.
पाचोऱ्यातील सावा मैदानावर झालेल्या सभेत ठाकरेंनी मोदी सरकारसह शिंदे-फडणवीस सरकार आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर तोफ डागली. स्थानिक मुद्देही भाषणात आणून त्यांनी गर्दीला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. चाळीस गद्दार गेले तर काही फरक पडत नाही. एक निष्ठावंत गेल्याने फरक पडतो, असे सांगत आर. ओ. तात्या पाटील यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांचा वापर अनेक लोक केवळ खुर्ची आणि सत्तेसाठी करतात. मात्र, आर. ओ. तात्या पाटील हे शेतकरी जगला तरच देश वाचेल, या दृष्टिकोनातून सतत शेतकरी प्रश्नांवर झटत असत. केवळ माझा शेतकरी व त्याच्या शेतीच्या विकासाला चालना मिळाली पाहिजे. शेतकर्यांचा खरा मित्र म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती, असे त्यांनी नमूद केले. निवडणूक झाल्यास पाचोऱ्यात गद्दारांना गाडणार की नाही, असे आवाहन केले. पाचोरा मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे सभेच्या आयोजक वैशाली सूर्यवंशी- पाटील यांचे चुलतभाऊ आहेत. वैशाली या आर. ओ. पाटील यांच्या कन्या. त्यामुळे पुढील निवडणुकीत बहीण-भावात लढत होण्याची चिन्हे आहेत. ठाकरे यांनी वैशाली सूर्यवंशी यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन करीत त्यांच्या उमेदवारीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले.
सभेपूर्वी पालकमंत्री गुलाबरावप पाटील यांनी संजय राऊत यांना चौकटीत राहून न बोलल्यास सभेत शिरण्याचा इशारा दिला होता. ठाकरे यांनी त्यांच्या या इशाऱ्याचा समाचार घेताना घुशी असा त्यांचा उल्लेख करुन निवडणुकीत घुशींना बिळातून बाहेर काढून आपटणार, असा निर्धार व्यक्त केला. बहिणाबाई चौधरी असत्या तर या नतद्रष्ट सरकारने त्यांनाही तुरुंगात टाकले असते. इमानाले इसरला त्याले नेक म्हणून नये, जन्मदात्याला भोवला त्याले लेक म्हणू नये, या बहिणाबाईंच्या काव्यपंक्तीचा आधारही त्यांनी घेतला. २०१४ मध्ये एकनाथ खडसे यांना युती तोडण्याची घोषणा करावयास सांगून त्यानंतर भाजपने त्यांना बाजूला फेकले. काम झाल्यानंतर त्यांना बाजूला टाकले, असे भाजपवर टीकास्त्र सोडले. कापसाला भाव नसल्याचा विषय, नुकसान भरपाई हे शेतकऱ्यांचे विषयही त्यांनी मांडले. याशिवाय हिंदुत्व, अदानी या विषयांचा पुनरुच्चार केला.
शिंदे गटाचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते सभेत शिरण्यासाठी गुलाबराव पाटील यांचे मुखवटे लावून वाहनांव्दारे पाचोऱ्याकडे निघाले असताना पोलिसांनी त्यांना अडविले. आमदार किशोर पाटील यांनी कार्यकर्त्यांना ही आपले काका आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सभा होत असल्याने सभेत कुठलाही गोंधळ करु नये, अशी विनंती केली. त्यामुळे शिंदे गटाचे पदाधिकारी माघारी परतले. जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्था पालकमंत्र्यांची जबाबदारी असताना, त्यांच्याच समर्थकांनी सभा उधळण्यासाठी नियोजन केल्याचे दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी चुलतभाऊ आमदार किशोर पाटील यांच्यावर घणाघात केला. शिवसेनेने भरभरून दिले. मात्र, तात्यांच्या घरपरिवारात गद्दारी निघाली. तात्यांच्या पुतण्याने तत्त्वांशी प्रतारणा केली असली, तरीही आपण शिवसैनिक मात्र तात्यांचा आणि शिवसेनेचा वारसा पुढे नेणार असल्यांचे सांगितले. एकंदरीत, जिल्ह्यातील ठाकरे गटाला बळ देण्याचे काम या सभेने केले.