निकालच नाही, विद्यार्थ्यांनी न्याय मागायचा कुणाकडे?
मुंबई: विविध परीक्षांच्या निकालांबाबत सातत्याने गोंधळ होत असल्याचे अनेक प्रकार मुंबईविद्यापीठाच्या कारभारातून समोर येत आहेत.
एकामागोमाग एक घडत असलेल्या या प्रकारांमुळे विद्यापीठाच्या कारभारावर विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी तृतीय वर्ष बीएमएसच्या विद्यार्थ्यांना शून्य गुण दिल्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा एकदा तृतीय वर्ष विधि शाखेतील काही विद्यार्थ्यांचे निकालच लागले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. अद्याप निकालच हाती न आल्यामुळे पुढील शिक्षणाचा खोळंबा होत असल्याने विद्यार्थ्यांनी न्याय मागायचा कुणाकडे, असा सवाल विद्यार्थी संघटना करत आहेत.
विधि महाविद्यालयांमधील काही विद्यार्थ्यांना पाचव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल अद्याप मिळालेला नाही. पुढील महिन्यात तृतीय वर्ष विधि शाखेची सहाव्या सत्राची परीक्षा निश्चित झालेली असताना पूर्वीच्या सत्राचे निकाल न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याखेरीज, पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी २५ मे ते १ जूनदरम्यान एटीकेटीची परीक्षा घेण्यात येणार असल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. उत्तरपत्रिका तपासणी, निकालात गोंधळ, निकालाला विलंब झाल्यास दरवेळी मुंबई विद्यापीठ प्रशासन या प्रकारांसाठी विद्यार्थ्यांकडे बोट दाखवतात. अनेकदा विद्यापीठ प्रशासनाकडून या प्रक्रियांबाबत पारदर्शकता ठेवली जात नाही किंवा या प्रक्रिया पूर्ण करताना अचूक पडताळणीचा अभाव असल्याचे दिसून येत असल्याने सातत्याने असे प्रकार घडत असल्याचे मनविसेचे मुंबई विद्यापीठातील माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी सांगितले.
विद्यापीठ म्हणतेय, या कारणांमुळे राखून ठेवला निकाल
विधि शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांवर चुकीची माहिती नमूद केली आहे. परिणामी, यामुळे ऑनलाइन पेपर तपासणीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.
वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्याने कोणत्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका आहे, हे समजण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे निकाल राखून ठेवला आहे. लवकरच या उत्तरपत्रिका ऑफलाइन पद्धतीने तपासण्यात येणार आहेत, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
याखेरीज, पाचव्या सत्राचा निकाल प्रलंबित असतानाही विद्यार्थ्यांना सहाव्या सत्राची परीक्षा देता येणार असल्याचे विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले आहे.