राज्यात सत्तेचा गैरवापर : शरद पवार
मुंबई: देशात आणि राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू असून, विरोधी पक्षांच्या नेत्यांना खोट्या केसेस टाकून तुरुंगात टाकले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान समारंभात मृत्यू पावलेल्या व्यक्तींविषयी दुःख व्यक्त करत, या घटनेची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत करावी, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी घाटकोपर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पवार म्हणाले, मला केंद्र सरकारने ‘पद्मविभूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार घेण्यासाठी मला राष्ट्रपती भवनला जावे लागले. हा पुरस्कार घेण्यासाठी माझ्यासोबत केवळ दहा लोक होते. ‘महाराष्ट्र भूषण’ हा कार्यक्रम धर्माधिकारी यांच्या सन्मानाचा होता. हा कार्यक्रम धर्माधिकारी यांच्या संघटनेने आयोजित केला नव्हता, तर तो महाराष्ट्र सरकारने आयोजित केला होता. परंतु, राज्य सरकारने खबरदारी घेतली नसल्याने तेथे लोक मृत्युमुखी पडले. प्रचंड उन्हाळा आणि उष्माघाताची शक्यता असताना हा कार्यक्रम उघड्यावर घेतला जातो याचा अर्थ सरकारला आपली प्रचंड शक्ती जमवून त्यातून अनुकूल वातावरण महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकीत करायचे होते, असा आरोप पवार यांनी केला.
खारघर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एका अधिकार्याची समिती नेमली आहे. हा अधिकारी कर्तव्यदक्ष आहे. परंतु, कोणताही अधिकारी सरकार आणि सहकारी अधिकार्यांच्या विरोधात अहवाल देण्यास तयार नसतात. या दुर्दैवी घटनेची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत करणे आवश्यक आहे, असे पवार म्हणाले.
संविधानाची हत्या
देशभरातील घटनांचा संदर्भ देत पवार म्हणाले, काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये अल्पसंख्याकांवर हल्ले आणि हत्या झाल्या. या जातीय दंगलीच्यामागे गुजरातमधील सत्ताधारी पक्ष होता. या प्रकरणात ज्यांना अटक झाली त्यामध्ये एक महिला होती. खासदार, आमदार, मंत्री आणि अन्य त्यांचे सहकारी होते. इतके दिवस ती केस चालली. या लोकांना अटक झाली. आता त्यांना निर्दोष सोडण्यात आले आहे. मग हत्या कोणी केल्या, असा प्रश्न पडत असून, या निकालामुळे देशाचे संविधान आणि कायद्याचीदेखील हत्या झाली आहे.
महाराष्ट्रातही सत्तेचा गैरवापर सुरू आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर विविध आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले, असे पवार म्हणाले.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.