वाहनांच्या किंमतीत होणार वाढ
नाशिक:वाहनांतून वाढत असलेल्या वायु प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. याचाच एक भाग म्हणून १ एप्रिलपासून उत्पादित होत असलेल्या वाहनांमध्ये बीएस-६ चे ओबीटी-२ मानांकित असणार आहे.
यामुळे वायुप्रदुषणात घट होणार असली तरी ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानासाठी जादा किंमत मोजावी लागणार आहे. किंमतीत किती प्रमाणात वाढ होते, ही बाब येत्या काही दिवसांत स्पष्ट होऊ शकेल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
२०२२ साली बीएस-४ प्रकारच्या वाहनांचे उत्पादन व विक्रीवर बंदी घातल्याने बीएस-६ या प्रकारातील वाहने बाजारात दाखल झाली होती. यादरम्यान व्यावसायिक (कमर्शिअल) वाहनाच्या किंमतीत सुमारे एक ते सव्वा लाखापर्यंत वाढ झालेली होती.
पर्यावरण संरक्षणासाठी कायद्यात आणखी कठोर तरतूदी केल्या जात असून, याचाच एक भाग म्हणून बीएस-६ चे ओबीडी-२ मानांकन असलेले वाहन रस्त्यावर उतरविले जाणार आहे. येत्या १ एप्रिलपासून वाहन उत्पादकांना केवळ याच वाहनाचे उत्पादन व विक्री करता येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये नवीन वाहन खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहे.
वितरकांकडील माल विक्रीची मुभा
उत्पादकांना बीएस-६ वाहने उत्पादन व विक्रीवर बंदी असली तरी ३१ मार्चपर्यंत उत्पादित व विक्री केलेला वाहनांचा माल वितरकांकडे उपलब्ध आहे. बीएस-४ वर बंदी आणताना वितरकांनाही विक्रीवर निर्बंध आणले होते.
परंतु यंदा मात्र वितरकांकडे त्यांच्या गुदामात उपलब्ध असलेला माल विक्री करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. हा माल विक्री झाल्यानंतर वितरकांकडून मागणी केलेला नवीन माल हा जादा किंमतीचा असल्याने या वाहनांची विक्री सुधारित किंमतीनुसार केली जाणार असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
“१ एप्रिलपासून बीएस-६ चे ओबीडी-२ मानांकन असलेल्या वाहनाचे उत्पादन होत असून, या आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाहनाच्या किंमती वाढणार आहेत. वाढीव किंमतीचा अंदाज या महिन्याअखेरपर्यंत येऊ शकेल.” – सचिन महाजन, व्यावसायिक.