समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचा मृत्यू
बुलढाणा:बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचं निधन झालं आहे, तर क्रिकेटपटू जखमी झाला आहे. माजी क्रिकेटपटू प्रविण हिंगणीकर यांच्या पत्नी सुवर्णा यांचा या अपघातात मृत्यू झाला. मेहकर जवळच्या लासुरा फाट्याजवळ क्रेटा गाडी उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन धडकली. या अपघातात हिंगणीकर यांच्या पत्नीचं निधन झालं तर एक जण जखमी झाला आहे. जखमीला मेहकरमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
प्रविण हिंगणीकर आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा पुण्याहून नागपूरला जात होते. कार चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. प्रविण हिंगणीकर हे विदर्भाच्या रणजी टीमचे कर्णधार होते. यानंतर त्यांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशनसाठी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या.
यानंतर 2018 साली हिंगणीकर यांची बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पिच क्युरेटर म्हणून नियुक्ती केली होती. रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भाकडून खेळताना प्रविण हिंगणीकर कर्णधारासोबतच ऑलराऊंडर आणि विकेट कीपर म्हणूनही मैदानात उतरले. प्रविण हिंगणीकर यांनी 52 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 29.52 च्या सरासरीने 2,805 रन केल्या, यामध्ये 3 शतकं आणि 16 अर्धशतकांचा समावेश होता. याशिवाय त्यांनी 47 विकेटही घेतल्या. 25 रनवर 5 विकेट ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.