अजित पवार महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, भाजपकडून त्यांच्याबाबत अफवा : संजय राऊत
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची आघाडी मजबूत आहे. याची भीती भाजपला वाटत असून, त्यांच्या पायाखालची वाळू सरकरली आहे. म्हणून 2024 पर्यंत आघाडी खिळखिळी करण्याचे भाजप कारस्थान करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला.अजित पवार (Ajit Pawar) हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहे. ते आघाडीचे प्रमुख नेते असल्याचे राऊत म्हणाले. अजित पवार यांच्यासंदर्भातील सध्याच्या बातम्या खोट्या आहेत. भाजप अफवा उठवत असल्याचे राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नावाशी बांधिल
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे संजय राऊत म्हणाले. पण पक्ष फुटला नाही. आजही पक्ष शरद पवार यांच्या नावाशी बांधिल आहे. आजही शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाशी बांधिल आहे. आमदार फुटल्याच्या बातम्या हे अंतिम सत्य नसल्याचे राऊत म्हणाले. अजित पवार यांच्याबाबत प्रसिद्ध केलेल्या बातम्या भाजप तयार करत आहे. भाजप लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे काम करत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पोटात गोळा आला असेल
सध्या सुरु असलेल्या बातम्यांमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या पोटात गोळा आला असेल. त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो असे संजय राऊत म्हणाले. अजित पवार महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांचे राजकीय भविष्य महाविकास आघाडीतूनच पुढे शिखरावर जाणार आहे. त्यांच्याबाबत सध्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. याचा महाविका सआघाडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी माझे सकाळी बोलणं झाले असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.
भाजपमध्ये असणारी भरती बिनपगारी असेल
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या पक्षामध्ये हा भरतीचा महिना असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले की, भाजपमध्ये असणारी भरती बिनपगारी असेल असा टोला राऊतांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूनचे लागेल. मला खात्री आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरतील असे राऊत म्हणाले. हा देश नियम, कायदा, संविधान यानुसार चालतो असे मी मानतो. भलेही केंद्रातले सत्ताधारी यंत्रणावर दबाव आणत आहेत, असे राऊत म्हणाले.