टॅंकरखाली आल्याने तरुणी जागीच ठार
छत्रपती संभाजीनगर : वडीलांसोबत दुचाकीवर महाविद्यालयात जाताना महापालिकेच्या पाण्याच्या टॅंकरखाली आल्याने भावी डॉक्टर तरुणी ठार झाली. हा दुर्दैवी अपघात ३ एप्रिलरोजी सकाळी साडेसात वाजता महावीर चौकातील उड्डाणपुलाखाली झाला दीक्षा मधुकर काळे (वय २३, रा. अश्वमेध कॉलनी, मिलींद महाविद्यालय परिसर) असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात दीक्षाचे वडील किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी टॅंकरचालकाविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षा ही महात्मा गांधी मिशनच्या महाविद्यालयात आयुर्वेदिकच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. तर तीची आई डॉ. लता मधुकर काळे या छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या दंत महाविद्यालय, रुग्णालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम पाहतात.
तिचे वडील निवृत्त आहेत. सध्या परीक्षा सुरु असल्याने दीक्षाचे वडील तिला दुचाकीवरुन (एमएच २० ३४२१) पेपरला सोडण्यासाठी छावणीकडून जालना रस्त्याने एमजीएमकडे येत होते. दरम्यान, महावीर चौकाजवळ त्यांच्या समोर चालत असलेला पाण्याचा टॅंकर (एमएच २० डब्लू ५२५६) हा इंडिकेटर न लावता महावीर चौकातून मध्यवर्ती बसस्थानकाकडे वळला.
त्याचदरम्यान काळे यांच्या दुचाकीला धक्का लागल्याने ते उजव्या बाजूला पडले, तर दीक्षाच्या डोक्यावरुन टॅंकरचे चाक गेले. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रिक्षाने घाटीत दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
चालक पोलिसांच्या ताब्यात
याप्रकरणी मधुकर काळे यांच्या फिर्यादीवरुन टॅंकरचालकाविरोधात कलम ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल झाला असून पोलिसांना चालकाला ताब्यात घेतले आहे. दीक्षाचे वडील हे सामाजिक न्याय विभागात वर्ग अधिकारी पदावरुन निवृत्त झालेले आहेत. दीक्षाची मोठी बहिण हैदराबाद येथे दंत विभागाच्या डॉक्टर आहेत. दीक्षावर सायंकाळी सातदरम्यान छावणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.