मोदींच्या ‘कॅबिनेट’मध्ये महाराष्ट्रातून आणखी एकाला मंत्रिपद
नवी दिल्ली: (आशोक कुंभार )पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या टर्ममधल्या मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार कधी होणार? याबाबत मागच्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत. नव्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या खासदारांनाही मंत्रिपद मिळेल, असं सांगितलं जात आहे, पण या मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महाराष्ट्रातल्या भाजप नेत्याची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या पदाला केंद्रीय गृहमंत्रालयाने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रपतींनी 2 डिसेंबर 2022 ला हंसराज अहीर यांची नियुक्ती केली होती. आता या पदाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा लागू करण्यात आला आहे.
हंसराज अहीर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममध्येही मंत्री होते, पण 2019 सालच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. महाराष्ट्रातून काँग्रेसने लोकसभेची केवळ एक जागा जिंकली ती हंसराज अहीर यांचा पराभव करून. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. हंसराज अहीर यांनी यापूर्वी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं 4 वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, खासदारकीच्या कार्यकाळात कोल व स्टील सह अन्य संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्ष व सदस्य पदावरही त्यांनी काम केलं. 16 व्या लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री तसेच उर्वरक व रसायन मंत्री या पदांवरही ते होते. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हंसराज अहीर यांनी देशातील विविध राज्यातील ओबीसी प्रवर्गातील शासकीय, निमशासकीय, उद्योग, विविध कंपन्या, कोळसा खाण क्षेत्रातील ओबीसी अधिकारी, कर्मचारी, कामगारांचा अनुशेष, रोष्टरनुसार भरण्याकरीता सुनावणीद्वारा आढावा घेतला.