पाकिस्तानमध्ये होळी खेळणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांना मारहाण
पाकिस्तान:पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर हल्ले होण्याच्या घटना घडत असतात. आज होळीच्या दिवशी देखील हिंदू विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. पंजाब विश्वविद्यालयाच्या परिसरात होळी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना कट्टरपंथी इस्लामिक विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी मारहाण केली आहे. यामध्ये १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत.
घटना सोमवारी लाहौरच्या पंजाब विद्यापीठामध्ये झाली आहे. तेथील लॉ कॉलेजमध्ये जवळपास ३० हिंदू विद्यार्थी होळी खेळण्यासाठी जमले होते. विद्यापीठानेही त्यांना परवानगी दिली होती. जेव्हा आम्ही कॉलेजच्या लॉनवर जमा झालो तेव्हा इस्लामिक जमीयत तुलबा (IJT) च्या कार्यकर्त्यांनी होळी खेळण्यापासून रोखले. यामुळे धक्काबुक्की झाली. यामध्ये १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत, असे विद्यार्थी काशिफ ब्रोही याने सांगितले.
होळी साजरी करणा-या विद्यार्थ्यांपैकी एक खेत कुमार याच्या हाताला मार लागला आहे. आयजेटीने केलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी हे विद्यार्थी कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत असताना विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप खेत कुमार याने केला आहे. या दोन्ही घटनांविरोधात आम्ही पोलिसांत तक्रार केली आहे परंतू अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, असे त्याने सांगितले.
आयजेटी संघटनेचा विद्यापीठ प्रवक्ता इब्राहिम शाहिद या घटनेवर भाष्य केले आहे. त्याने आपल्य़ा संघटनेचा कोणताही सदस्य या मारहाणीत नव्हता असा दावा केला आहे. तर पंजाब विद्यापीठाचे प्रवक्ते खुर्रम शहजाद यांनी विद्यापीठाने परवानगी दिली नव्हती असे म्हटले आहे. जर समारंभ खोलीच्या आत आयोजित केला असता तर कोणतीही अडचण आली नसती, असेही त्याने म्हटले आहे.