एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या प्रश्नावर अखेर निघाला तोडगा
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. गेल्या महिन्यापासून राज्य सरकार ही जबाबदारी काटेकोरपणे पाळत नसल्याचं दिसत आहे. त्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उचललं होतं. अखेर यावर तोडगा निघाला आहे. दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत राज्य सरकार एसटी महामंडळाला पगारासाठी आवश्यक निधी देणार आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे पगार 7 तारखेला होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी माहिती दिली आहे.
आत्मक्लेश आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमंत्रण देण्यात आलं होतं. दुपारी विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळावा, त्यासोबतच एसटी आंदोलनावेळी 16 मागण्यांसंदर्भात जी सहमती झाली होती त्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती.