आम्ही इथे कुणाला खूष करायला बसलो नाही, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी खडेबोल सुनावले
सर्वोच्च न्यायालयाने याचिका आज तरुण तरुणींचे लग्नाचे वय हे एकसमान असण्याबाबत करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत याचिकाकर्ते अश्विनी उपाध्याय यांनी एक टिपण्णी केली.
त्या टिपण्णीवरून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे त्यांच्यावर संतापले व त्यांनी उपाध्याय यांना खडे बोल सुनावले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर उपाध्याय यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने खटला सर्वोच्च न्यायालयात स्थलांतरीत करण्याला अर्थच काय? असा सवाल केला. त्यांचा हा प्रश्न ऐकून सरन्यायशीश नाराज झाले व त्यांनी उपाध्याय यांना चांगलेच सुनावले. ‘आम्ही इथे आमचं सांविधानिक कर्तव्य बजावयाला बसलो आहोत. तुम्हाला किंवा इतर कुणाला खूष करण्यासाठी नाही’ अशा शब्दात सरन्यायाधीशांनी उपाध्याय यांना फैलावर धरले.
‘आम्ही तुमचा सल्ला ऐकायला बसलेलो नाही. सुदैवाने आमची वैधता याच्यावर अवलंबून नाही की तुम्ही आमच्याबाबतीत काय विचार करता. त्यामुळे तुमच्या अनावश्यक टिपण्णीची गरज नाही. आम्ही इथे आमचं सांविधानिक कर्तव्य बजावयाला बसलो आहोत. तुम्हाला किंवा इतर कुणाला खूष करण्यासाठी नाही. कोणत्याही प्रकारच्या राजकारणाला खूष करण्यासाठी इथे नाही. त्यामुळे अशा टिपण्णी नका देत जाऊ. तुम्ही बारचे सदस्य आहात, त्यामुळे इथे वाद नका घालू. हे राजकारणाचा मंच नाही’ असे चंद्रचूड यांनी सुनावले.