जगभरातील देशांना इंधनासाठी मोठा संघर्ष
सध्या जगभरातील देशांना इंधनासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. रशियाकडून तेल घेऊ नये, यासाठी अमेरिका दबाव आणत आहे.
युरोपसह इतर अनेक देश अमेरिकेच्या दबावाला बळी पडत आहेत. पण या दबावातही हिंदुस्थानच्या मुत्सद्देगिरीमुळे आपल्याला स्वस्त तेल मिळत आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात हिंदुस्थानने रशियाकडून सर्वाधिक तेल आयात केले आहे.
पाश्चात्य देशांनी रशियन तेलावर विविध निर्बंध लादले होते, त्यामुळे हिंदुस्थानने मोठ्या सवलतीत तेल आयात केले. आकडेवारी दर्शवते की, रशिया आयातीच्या बाबतीत हिंदुस्थान चौथा सर्वात मोठा भागीदार बनला आहे. हिंदुस्थानने 37.31 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आयात केली आहे. ही वार्षिक 384 टक्के वाढ आहे. हिंदुस्थानकडून निर्यात होणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांमध्येही तेजी पाहायला मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 10 महिन्यांच्या आर्थिक कालावधीत देशाचीची निर्यात 78.58 अब्ज डॉलर होती. गेल्या वर्षी ते 50.77 अब्ज डॉलर होती. तेल आयातीच्या बाबतीत सरकारने अशी मुत्सद्देगिरी स्वीकारली आहे, ज्यामुळे संकटकाळातही भारतीयांना स्वस्त इंधन मिळत आहे. विशेष म्हणजे, तेल आयातीच्या बाबतीत हिंदुस्थान हा तिसरा सर्वात मोठा देश आहे.
रशियन तेलाच्या आयातीला अमेरिका विरोध करत होती, पण काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानवर कोणतेही निर्बंध लादणार नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील सहायक सचिव (युरोपियन आणि युरेशियन व्यवहार) कॅरेन डॉनफ्रीड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही हिंदुस्थानवर कोणतेही निर्बंध लादणार नाही. हिंदुस्थानसोबतचे आमचे संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत. युक्रेनला त्याच्या बाजूने मानवतावादी मदत देण्यात आल्याच्या भारताच्या पावलाचेही आम्ही स्वागत करतो. भारताने ज्या प्रकारे रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याचे आवाहन केले, त्या विधानाचेही स्वागत करायला हवे.