कलियुगातही बाप्पा जन्म घेणार! गणेश पुराणात कलियुगातील गणेश अवताराबद्द्दल केलेले भाष्य जाणून घेऊया
श्री गणेशाची अनेक नावे आहेत त्यापैकी काही प्रसिद्ध नावे खालीलप्रमाणे आहेत. गजानन, गणपती, मोरया, मोरेश्वर, गणेश, एकदंत, विनायक, सुमुख, भालचंद्र, लांबोदर इत्यादि. कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची आराधना पुजा केली जाते. श्री गणेशाला विधिवत वंदन पूजन केले जाते. सर्व देवी देवतांमध्ये गणेशजी सर्वांचे लाडके आहेत.
२५ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती आहे. आपल्या सर्वांचे लाडके दैवत म्हणजे बाप्पा!
कलियुगात बाप्पा धूम्रकेतु या नावे अवतार घेणार आहेत. त्याला आपण अनेक नावांनी ओळखतो. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्नविनायक, विनायक, धुमकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र आणि गजानन अशी १२ नावे आहेत.
त्याच्या प्रत्येक नावामागे एक आख्यायिका आहे. इथे आपण त्याच्या जन्मकथांबद्दल जाणून घेऊया. तसेच गणेश पुराणात कलियुगातील गणेश अवताराबद्द्दल केलेले भाष्य जाणून घेऊया.
सत्ययुग: सत्यायुगात कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी आदिती यांच्या उदरी बाप्पाने महोत्कट विनायक या नावाने जन्म घेतला. तोच आपण माघी गणेशोत्सव या नावे उत्सव साजरा करतो. या अवतारात, बाप्पाने देवांतक आणि नरांतक या राक्षसांचा वध केला, धर्म स्थापित केला आणि अवतार संपविला. या युगात गणेशाचे वाहन सिंह होते
त्रेता युग: त्रेता युगात, गणपतीचा जन्म भद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी झाला. त्याचे नाव गुणेश ठेवले गेले. त्रेता युगात त्याचे वाहन मयूर होते, म्हणून त्याला मयुरेश्वर अशी ओळख मिळाली. या अवतारात, बाप्पाने सिंधू नावाच्या राक्षसाचा नाश केला आणि ब्रह्मदेव कन्या, सिद्धि आणि रिद्धी यांच्याशी लग्न केले.
द्वापर युग: द्वापर युगात बाप्पाचे सिंदूर चर्चित रूप होते. या अवतारात त्याने सिंदुरासुरचा वध केला आणि त्याने कैद केलेल्या अनेक राजांना आणि वीरांना सोडवले. असे म्हणतात, की पराशर ऋषींच्या आश्रमात बाप्पा लहानाचा मोठा झाला आणि त्यांच्याकडून त्याने १४ विद्या ६४ कला शिकून घेतल्या. तसेच गजमुख नामक दैत्याचा वध केला व त्याचे नाव धारण करून भक्ताचा उद्धार केला.
कलियुग :
त्यानंतर येते कलियुग! वरील तिन्ही युगांमध्ये बाप्पा भक्तांच्या रक्षणार्थ धावून गेला. कलियुगात भक्त बाप्पाला आग्रहाने घरी बोलावू लागला. बाप्पा त्याच्या विनंतीला भूलुन आलासुद्धा! लोकमान्य टिळकांनी सामाजिक गरज लक्षात घेता बाप्पाचा उत्सव सार्वजनिक केला. मंडपाच्या व्यासपीठावरून व्याख्यान, गाणी, समाजभान, समाजप्रबोधन इ. उपक्रम चालत असत. परंतु, अलीकडच्या काळात गणेशोत्सवाचे होणारे डीजेमय बीभत्स रूप पाहता, कलियुगात बाप्पा अवतार घेईल याची शाश्वती वाटत नाही.
तरीदेखील गणेश पुराणात उल्लेख केल्यानुसार कलियुगात बाप्पा धूम्रकेतु या नावे अवतार घेणार आहेत. आधीच्या तीन युगात बाप्पाने आपले वचन पूर्ण केले त्याअर्थी कलियुगातही बाप्पा अवतार घेतील आणि अन्य दुष्ट प्रवृत्तींचा नाश करतील अशी आशा बाळगूया. बाप्पा मोरया!