ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

देहू-आळंदीत वारीच्या तयारीची लगबग सुरु


आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे देऊळवाड्यातील थेट प्रक्षेपण रविवारी (ता. ११) केले जाणार असून, शहरातील विविध सहा ठिकाणांसह दर्शबारीत मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहे. तसेच, देऊळवाड्यातील भाविकांची सुरक्षा आणि संशयित घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ९५ सीसीटीव्ही कॅमेरे देऊळवाडा आणि परिसरात लावले आहेत.



आषाढी वारी सोहळ्यानिमित्त आळंदीत पालखी प्रस्थान येत्या रविवारी आहे. मंदिरातील गर्दीचे नियोजन, घातपात अथवा चोरीसारख्या घटनांवर नजर ठेवण्यासाठी देवस्थान व्यवस्थापनाने ९५ सीसीटीव्ही कॅमेरे विविध ठिकाणी लावले आहेत. मंदिराभोवतीही कॅमेरे लावले जाणार आहेत. प्रस्थान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मंदिराबाहेरील भाविकांना केले जाणार आहे.

एकाच ठिकाणी भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी ही सोय केली जात आहे. यासाठी प्रदक्षिणा रस्ता, भराव रस्ता, वडगाव चौक, मरकळ चौक, पालिका चौक, इंद्रायणी घाट आणि दर्शन मंडप, अशा सहा ठिकाणी स्क्रीन लावले जाणार आहेत. मंदिर स्वच्छतेसाठी देवस्थानचे ३५ कर्मचारी आणि स्वकाम सेवा मंडळाचे दोनशे स्वयंसेवक एका वेळी २५च्या गटाने २४ तास स्वच्छता करणार आहेत.

महाद्वार, गाभारा मंदिरात पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त आहे.या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई आणि त्यांच्या बरोबर तीन माजी विश्वस्त संपूर्ण वारी काळासाठी असणार आहेत. सोहळ्यासाठी दिंडीकऱ्यांना निमंत्रणे यापूर्वीच दिली आहेत. एकंदर सोहळ्यासाठी देवस्थान सज्ज झाले आहे. तयारी दृष्टिक्षेपात

आळंदी शहरात सहा ठिकाणी स्क्रीन

९५ सीसीटीव्ही कॅमेरे

कर्मचारी, स्वयंसेवक २४ तास स्वच्छता करणार

महाद्वार, गाभारा मंदिरात पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

देहू – आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या चार दिवसांवर आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा आणि पावसापासून संरक्षण मिळावे, या साठी संत तुकाराम महाराज संस्थानने विशेष काळजी घेतली आहे. आषाढी वारीसाठी जगद्‍गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या दहा जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर संत श्री तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. याबाबत पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे म्हणाले, ”पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ, अब्दागिरी यांना पॉलिश करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यात ३२९ दिंड्यांची नोंद आहे. नव्याने ४५ दिंड्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

सोहळ्यातील सर्व दिंडीप्रमुखांना संस्थानने पत्रव्यवहार केला आहे. तसेच वाहनांसाठी पास देणे सुरू आहेत. खडकी येथील लष्कराच्या ५१२ डेपोमध्ये चांदीच्या रथाच्या दुरुस्तीचे काम केले आहे. हायड्रॉलिक ब्रेक बसविण्यात आले आहेत. तसेच रथावर जीपीएस सिस्टीम बसविली आहे. तसेच आठ सीसीटिव्ही कॅमेरे, जनरेटर बसविण्यात आले आहेत. पालखी मार्गावर भाविकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाणी, आरोग्य, वीज, रस्ते विभागाला पत्रव्यवहार केला आहे. पालकमंत्री आणि विभागीय आयुक्तांना पालखी मार्गावरील समस्यांबाबत माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे पालखी मार्गावर निवाऱ्यासाठी तंबूची व्यवस्था केली आहे.पालखी मार्गावरील अन्नदानासाठी लागणारे साहित्य खरेदी केले आहे. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा व पूजेच्या साहित्याची खरेदी केली आहे. मानकरी सेवेकरी, दिंडी प्रमुखांना पत्र्यव्यवहार केला आहे. देऊळवाड्यातील स्वच्छतेसाठी ३० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सहा सुरक्षारक्षकही तैनात केले आहे.

पालखी सोहळा तयारी पूर्ण झाली आहे. दिंडीकऱ्यांना पत्रव्यवहार झाला आहे. सरकारकडून विविध सोयी-सुविधा देण्यासाठी कळविले आहे. देऊळवाडा येथे महिलांसाठी हिरकणी कक्ष सुरू करण्यात येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button