बांबूपासून डिझेल तयार:सुधीर मुनगंटीवार
नागपूर : बांबूवर आधारित अनेक अभ्यासक्रम गोंडवाना विद्यापीठात सुरू करणार आहेत. बांबूपासून उत्तम दर्जाचे टॉवेल तयार होतात. बांबूपासून डिझेल तयार करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असून यासंदर्भात ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीची बोलणी सुरू आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.अॅग्रोव्हीजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ‘बांबू उत्पादनातून उत्पन्नाच्या संधी’ यावरील परिषदेत ते बोलत होते. माजी आमदार पाशा पटेल, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाराष्ट्र बांबू मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास राव, सल्लागार डॉ. सी. डी. मायी, आयोजन सचिव रवींद्र बोरटकर उपस्थित होते. ते म्हणाले, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये बांबू लागवडीला वाव आहे.
महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये ही बाब शक्य आहे. बांबू संदर्भातील नवनवीन संशोधन सुरू असून शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते. जागतिक स्तरावर बांबूची मोठी व्यापार पेठ असून चीन व आशिया खंडातील अन्य देशांमध्ये बांबूवर आधारित अर्थव्यवस्था बळ घेत आहे. बांबू उत्पादन योग्य प्रकारे हाताळल्यास हे पीक कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते. हे प्रयोगातून सिद्ध झाले आहे. अन्न-वस्त्र-निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या सर्व क्षेत्राला बळकटी देण्याचे काम बांबूचे उत्पादन करू शकते. बांबूपासून धानापर्यंत पोहोचण्यासाठी लवकरच वनविभाग मनरेगा, जलसंधारण विभागाची बैठक घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.
पाशा पटेल यांनी सध्या शेतकरी झाडाचे दुश्मन झाले आहेत. त्यामुळे प्राणवायू व पर्यावरण रक्षण धोक्यात आले आहे. याची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे, असे आवाहन केले. प्रास्ताविकातून डॉ. सी. डी. मायी यांनी बांबू लागवडीविषयी माहिती दिली.