१७ वर्षे सात महिन्यांची मुलगी अचानक बेपत्ता
सोलापूर : पती-पत्नीचा सुखाचा संसार सुरू असतानाच अचानक पतीने साथ सोडून जगाचा निरोप घेतला. मुलीला शिकवून मोठे करायचे, हे स्वप्न उराशी बाळगून ऐन तारुण्यात विधवा झालेल्या आईने धुणी-भांड्याचे काम स्वीकारल स्वत:च्या पोटाला चिमटा घेतला पण, मुलीच्या शिक्षणाला काहीच कमी पडू दिले नाही. मात्र, कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडलेली साडेसतरा वर्षाची मुलगी घरी आलीच नाही. आईने एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली.
सोलापूर शहर-जिल्ह्यातून विवाहित महिला, तरुण मुली व अल्पवयीन मुली (१६ ते १७ वयोगट) बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. मागील साडेदहा महिन्यांत पोलिसांकडे जवळपास अकराशेजण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यातील काहीजण सापडले, पण आणखी काहींचा तपास लागलेला नाही. शहरातून मागील १५ दिवसांत तब्बल १० (मुली, महिला, तरुणी) जण बेपत्ता झाले आहेत. त्यात एका १७ वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. बेपत्ता झालेल्यांपैकी कोणी कपडे आणायला तर कोणी भाजी आणायला जाण्याचा बहाणा केला. तसेच काहींनी कामासाठी जाते म्हणून तर काही मुलींनी घराबाहेर पडण्यासाठी कॉलेजला जाण्याचा बहाणासुद्धा सांगितल्याचे पोलिसांतील फिर्यादीवरून स्पष्ट होते. दरम्यान, कर्णिक नगर परिसरातील १७ वर्षे सात महिन्यांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. सकाळी साडेदहा वाजता आईला कॉलेजला जाते म्हणून ती बाहेर पडली होती. पुन्हा उशिरापर्यंत ती घरी आलीच नाही. घाबरलेल्या आईने इतरत्र शोध घेतला, पण तिचा शोध लागलाच नाही. शेवटी त्या माऊलीने पोलिसांत धाव घेतली. कोणीतरी फूस लावून तिला पळवून नेल्याचे पोलिसांना सांगितले. दुसरीकडे, कामाला जाते म्हणून राघवेंद्र नगरातील एक २८ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली असून त्याची नोंद एमआयडीसी पोलिसांतच झाली आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पालकांनो, मुलांसोबत सुसंवाद ठेवा
घराबाहेर पडणाऱ्या आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत, याची माहिती पालकांना हवी. आपल्या मुला-मुलींच्या स्वभावातील व शारीरिक बदलाची जाण पालकांना असायलाच हवी. त्यांच्याशी सतत सुसंवाद ठेवावा. त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत, याचा विश्वास त्यांना वेळोवेळी द्यायला हवा. त्यांना एकटेपणाची जाणीव कधीही होऊ देऊ नका, आम्ही जे करतोय ते तुमच्यासाठीच करतोय, हे त्यांना पटवून द्या; जेणेकरून त्यांच्या मनात कोणताही वाईट विचार येणार नाही.