महाराष्ट्र असा- तसा वाटला का? अजित पवार
महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा- तसा वाटला का? असा रोखठोक आणि संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहेमहाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कायदेशीर भूमिका मांडावी, चुकीची वक्तव्य करू नयेत. राष्ट्रवादी काँग्रेसची आज प्रदेश कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होत असून या बैठकीला आले असता अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला त्यावर बोलताना अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्य करणे ताबडतोब थांबवावे. त्यांचे हे वक्तव्य निंदनीय असून त्यांचा अजित पवार यांनी निषेध केला.
महागाई आणि बेरोजगारीवरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न
लोकांचे लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरुन हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत. सध्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे काय माहित. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक शब्दात त्यांना सुनावले पाहिजे. आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले आहे असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला. केंद्राने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही असा इशाराही अजित पवार यांनी दिला.
प्रत्येक राज्याचा अस्मितेचा प्रश्न असतो. अनेक मुख्यमंत्र्यांनी राज्याला एकसंघ ठेवण्याचा काम केले आहे. आता काहीही कारण नसताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका मांडली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. आम्ही शिर्डी येथे गेलो. पंढरपूर येथे गेलो तर दर्शन घेतो. आपली ती परंपरा आहे. तिथपर्यंत समजू शकतो मात्र ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणे कितपत योग्य आहे. २१ व्या शतकात जग कुठे चालले आहे. बदल होत असताना सायन्स काय सांगत आहे. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात… काय बोलावं आम्ही हतबल झालो ऐकून अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली