ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरनाथ यात्रेसाठी लागणाऱ्या वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी भाविकांचे हेलपाटे…


जळगाव: अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना प्रकृती व्यवस्थित असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र तालुका पातळीवरील ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात यापूर्वी मिळत होते. मात्र, आरोग्य विभागाने ऑनलाइन पद्धतीने नुकतीच माहिती प्रसारित करून वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आता जिल्हास्तरावर असलेल्या जळगाव जिल्हा शल्यचिकित्सकांना बहाल केले आहेत.



त्यामुळे जिल्ह्यातील भाविकांना प्रमाणपत्रासाठी जळगावला हेलपाटे मारावे लागत आहेत. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. लवकर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गर्दी होत आहे.

अमरनाथ यात्रा येत्या २७ जूनपासून सुरू होत आहे. पूर्वी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयातून प्रकृती व्यवस्थित असल्याचे प्रमाणपत्र मिळत होते.

मात्र, आता आरोग्य विभागाने राज्यात ३८ जिल्ह्यांतील तालुका पातळीवरील सरकारी रुग्णालये वगळली आहेत. त्याऐवजी जिल्हास्तरावरील जिल्हा शल्यचिकित्सकांना अधिकार दिले आहेत. संपूर्ण जिल्ह्यातून तपासणीसाठी एकाच उच्च पदस्थ वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास पाच ते दहा हजार भाविक अमरनाथ यात्रेला जातात. एवढ्या भाविकांची एका ठिकाणी तपासणी कशी होणार, असा प्रश्‍न भाविकांमधून उपस्थित होत आहे. पूर्वीप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील दोन सरकारी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचे अधिकार द्यावेत, अन्यथा भाविक राज्यभर आंदोलन करतील, असा इशारा भाविकांनी दिला आहे.

“अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या अनेक भाविकांचे मला फोन आले आहेत. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून लवकरच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पूर्वीप्रमाणे किमान दोन सरकारी रुग्णालयांत भाविकांना प्रकृती तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली जाईल.” -डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button