फक्त दोन तासांसाठी यूएई राष्ट्राध्यक्ष भारतात का आले?कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?आर्थिक आणि लष्करी संबंधांना नवी दिशा…

फक्त दोन तासांसाठी यूएई राष्ट्राध्यक्ष भारतात का आले? जाणून घ्या सुपरफास्ट भेटीमागचं गुपित!
कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
आर्थिक आणि लष्करी संबंधांना नवी दिशा
संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे सोमवारी भारतात आगमन झाले. त्यांच्या या दोन तासांच्या अल्पशा पण अत्यंत महत्त्वपूर्ण दौऱ्याने जागतिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
मित्रत्वाचे नाते जपण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल बाजूला सारत स्वतः विमानतळावर जाऊन त्यांचे जंगी स्वागत केले.
विमानतळावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांना प्रेमाने मिठी मारली, जे दोन्ही देशांमधील घट्ट मैत्रीचे प्रतीक मानले जात आहे. विशेष म्हणजे, स्वागतानंतर दोन्ही नेते एकाच कारमधून विमानतळावरून मुक्कामाच्या ठिकाणाकडे रवाना झाले. राष्ट्राध्यक्ष शेख अल नाहयान दुपारी ४:३० च्या सुमारास दिल्लीत पोहोचले आणि पंतप्रधान मोदींसोबतची त्यांची महत्त्वाची चर्चा ४:४५ वाजता सुरू झाली.
युएई राष्ट्राध्यक्षांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा पश्चिम आशियात मोठ्या घडामोडी घडत आहेत. भारताला नुकतेच ‘गाझा बोर्ड ऑफ पीस’मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याचा धोका टळला असून, अशा संवेदनशील काळात ही भेट महत्त्वपूर्ण ठरत आहे. शेख अल नाहयान अध्यक्ष झाल्यानंतरचा त्यांचा हा तिसरा आणि गेल्या दशकभरातील पाचवा भारत दौरा आहे.
कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
– या बैठकीत भारत-यूएई धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर.
– दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी धोरणांवर चर्चा झाली.
– संरक्षण उद्योगातील संयुक्त उपक्रम आणि लष्करी संबंध अधिक मजबूत करणे.
– कच्चे तेल आणि एलएनजी पुरवठ्याबाबतचे धोरणात्मक निर्णय
– प्रादेशिक आणि जागतिक हितसंबंधांच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण.
आर्थिक आणि लष्करी संबंधांना नवी दिशा
गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय संवाद वाढला आहे. ४ जानेवारी रोजी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी यूएईचा दौरा केला, तर डिसेंबरमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही द्विपक्षीय बैठकीत सहभाग घेतला होता.
सध्या यूएई हा भारतातील सातवा सर्वात मोठा गुंतवणूकदार असून, २००० सालापासून त्यांनी २२ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून झालेली ही धावती भेट केवळ दोन तासांची असली, तरी ती भारत-यूएई संबंधांना एका नवीन उंचीवर नेणारी ठरेल, असा विश्वास परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला आहे.










