व्हॉट्सअॅपवर तरुणींचे फोटो पाठवून डीलिंग, ठाण्यात हाय प्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश …

ठाणे : ठाणे शहरातील ठाणेनगर (Mumbai Crime) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक (Mumbai News) मोठं देहविक्रीचं रॅकेट उघडकीस आलं आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने ही कारवाई करत एका दलाल महिलेला अटक केली असून तिच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ही महिला सोशल मीडियाचा वापर करून देहविक्रीचे रॅकेट चालवत होती.
पोलिस तपासानुसार, ही आरोपी महिला व्हॉट्सअॅपद्वारे ग्राहकांना तरुणींचे फोटो पाठवून संपर्क साधायची. त्यानंतर सौदे निश्चित करून ती स्वत: तरुणींना घेऊन ठरलेल्या हॉटेलमध्ये पोहोचायची. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आरोपीवर गुप्तपणे लक्ष ठेवण्यात आलं आणि कारवाईचं नियोजन करण्यात आलं.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना 6 ऑक्टोबर रोजी गुप्त माहिती मिळाली की, ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु आहे. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. आरोपी महिलेशी संपर्क साधल्यानंतर तिने दोन तरुणींना घेऊन हॉटेलमध्ये येण्यास होकार दिला.
सौद्यादरम्यान तिने एका तरुणीचा सौदा 8,000 रुपये इतक्या रकमेत ठरवला. यातून 3,000 रुपये पीडित तरुणीला देणार असल्याचे सांगितले, तर उर्वरित 5,000 रुपये ती स्वत:कडे ठेवणार होती. ही माहिती आरोपीने पोलिस चौकशीत कबूल केली आहे.
सापळा यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं. तिच्यावर ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून तिचा मोबाईल व व्हॉट्सअॅप चॅट तपासले जात आहेत. यातून इतर ग्राहक आणि या रॅकेटमध्ये सामील असलेल्या आणखी काही व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, लवकरच आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर रॅकेटबाबत सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.











