
बीड : केज -घरात घुसून डोळ्यात मिरचीची पूड टाकून महिलेचा विनयभंग करून तिच्या नवऱ्यासह भावाला आणि भाच्याला मारहाण केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे. ही ४७ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह केज तालुक्यात वास्तव्यास आहे.
३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० ते ६:०० वा. च्या दरम्यान ती महिला ही शेतातून काम करून गावात आल्यानंतर तिच्या घराचे कुलूप उघडून आरोपी घरात गेली. आरोपी विकास बबन गोरे (रा. माळेगाव ह. मु. सुर्डी फाटा ता. केज) याने पाठीमागून घरात घुसला. त्याने महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून तिचा विनयभंग करीत तिला त्याच्यासोबत चल सांभाळतो, असे म्हणून तिच्यावर अत्याचार केले.
त्यानंतर त्या नराधमाने त्या महिलेला मारहाण करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. महिलेचा भाऊ सोडविण्यास आला असता त्याला मारहाण केली. महिलेच्या भाच्याने याचा जाब विचारला म्हणून त्याचे डोके फोडले. तर पीडित महिलेच्या पतीस काठीने मारहाण केली आणि आताच जेलमधून सुटून आलोय. माझं कोणी ही काही करू शकत नाही, असे म्हणत त्यांना एका एकाला गाठून जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून विकास गोरे या नराधमा विरुद्ध युसुफवडगाव ता. केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार संपत शेंडगे हे करीत आहेत.











