पतीने पत्नीची भरदिवसा चाकूने भोसकून हत्या,चाकूने केले ११ वार; ३ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न…

पतीने पत्नीची भरदिवसा चाकूने भोसकून हत्या केलीय. बस स्टँडवरच लेकीसमोर पतीने ११ वार केले. दोघांचंही ३ महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. सोमवारी सकाळी सुनकादकट्टे बस स्थानकात ही घटना घडली.
रेखा रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडली होती. तिचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे रेखाच्या मुलीच्या डोळ्यासमोरच लोहिताश्वने ही हत्या केली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोहिताश्व, त्याची पत्नी रेखा आणि १२ वर्षांची मुलदी बस स्टँड परिसरात आले होते. त्यावेळी लोहिताश्वने त्याच्या पत्नीवर चाकू रोखला. तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या काहींनी लोहिताश्वला रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याने पत्नी रेखाच्या छातीवर आणि पोटात सपासप वार केले. यानंतर लोहिताश्व घटनास्थळावरून फरार झाला.
वरिष्ठ पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी प्राथमिक तपासात अशी माहिती समजली की दोघांचं तीन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. रेखा एका कॉल सेंटरवर काम करायची तर लोहिताश्व कॅब चालक होता. कॉमन मित्रांच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली आणि दीड वर्षाच्या ओळखीनंतर त्यांनी लग्न केलं होतं.
वैवाहिक वादातून लोहिताश्वने पत्नी रेखाची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. सुंकदकट्टेजवळ एका भाड्याच्या खोलीत ते राहत होते. रेखाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. त्यापैकी मोठ्या १२ वर्षांच्या मुलीसमोर लोहिताश्वने तिची हत्या केली. तर लहान मुलगी रेखाच्या आई-वडिलांकडे असते.
लग्नानंतर लोहिताश्व आणि रेखा यांच्यात सतत भांडण व्हायचं. सोमवारीसुद्धा त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. रेखा तिच्या मुलीसोबत बस स्टँडवर पोहोचली होती. त्यावेळी लोहिताश्व तिथं पोहोचला आणि वाद घालयला लागला. तिथंच रागाच्या भरात पत्नीवर चाकूने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या रेखाचा जागीच मृत्यू झाला.











