
Crime News : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील डाबी गावात एका पतीनेच आपल्या पत्नीचा निर्घृण खून केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
मृत महिलेचे नाव शोभा तुकाराम मुंडे (वय 35) असून तिला दोन मुले आणि एक मुलगी आहे. घटनेनंतर आरोपी पती तुकाराम मुंडे फरार झाला आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास तुकाराम मुंडेने पत्नी शोभाचा खून केला आणि त्यानंतर तो पसार झाला. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्याची तयारी केली, मात्र नातेवाईकांनी त्याला जोरदार विरोध केला.
आरोपीला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान
जोपर्यंत आरोपी तुकाराम मुंडेला अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू दिला जाणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेत पोलिसांना अडवले. नातेवाईकांच्या या भूमिकेमुळे पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला. आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत











