
बीड : शहरातील महाराणा प्रताप चौकात मंगळवारी मध्यरात्री एका किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या झाली आहे. विजय काळे (वय ३०, रा. धारूर) असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याच्याच मित्राने छातीत चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय काळे आणि त्याचा मित्र मंगळवारी रात्री महाराणा प्रताप चौकात एकत्र होते. त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी मित्राने रागाच्या भरात विजयच्या छातीत चाकूने वार केले. विजयच्या डाव्या बाजूला गंभीर जखम झाली.
घटनेनंतर विजयला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली
सापळा रचून आरोपीला अटक
मयत विजयने पोस्ट केलेला त्याच्या नृत्याचा व्हिडिओ शेवटचा व्हिडिओ ठरला. घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. एका डोंगराच्या परिसरात आरोपी लपून बसल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करत बड्या शिताफीने आरोपीला अटक केली आहे. मयत विजय काळे हा देखील गुन्हेगारी स्वरूपाचा होता, त्याच्यावर बीडसह राज्यभरात अनेक पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.











