जीआरमधील तो शब्द. हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती येताच मनोज जरांगे आक्रमक…

महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा विषय चांगलाच गाजताना दिसत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात मोठे आंदोलन केले. या आंदोलनावेळी मनोज जरांगे पाटील यांनी काही मागण्या ठेवल्या होत्या. .
त्यातील बहुतांश मागण्या मान्य झाल्या असून मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली आहे. यात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती पडताच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील एक गंभीर आरोप केला आहे.
हे लोक कधीच आपल्या बाजून बोललेले नाहीत
मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल येत असलेल्या विविध जीआरवरुन होणाऱ्या टीकांना प्रत्युत्तर दिले. त्यांना ज्या आरक्षणावर राजकारण करायचं होतं, त्यांना ज्या गॅझेटवर राजकारण करायचं होतं. ज्याच्यावर ते आपलं जीवन जगत होते, ते आता पूर्ण कोलमडायला आलं आहे. हे लोक कधीच आपल्या बाजून बोललेले नाहीत. कोणताही निर्णय झाला की मराठा समाजाला वाटतं की हे करायला नको होतं, यानंतर ८-१५ दिवसांनी वाटतं की पाटलांनी केलं तेच बरोबर केलं, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मी आनंदी आहे, समाज आनंदी आहे
मी जे काही करतोय ते मराठा बांधवांसाठी करतोय. ज्याच्या नोंदी नाहीत, त्यांच्यासाठी आता आपण गॅझेटचा वापर करतोय. मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणावाचून राहणार नाही, हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा. कोणाचं ऐकून तुमचं आणि आमचं भलं होणार नाही. हैदराबाद गॅझेटच्या नोंदी लक्षात घेऊन मराठा समाज ओबीसीत जाणार आहेत. मी आनंदी आहे, समाज आनंदी आहे. कोणी काही बोललं तरी आम्हाला काही फरक पडत नाही. मंत्रिमंडळातील लोकांना स्पष्ट केले आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
एखाद्या शब्दात घोळ झाला असेल तर…
मला आणि तुम्हाला एकमेकांपासून तोडायचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोणीही यांच्यावर विश्वास ठेवू नका. जर गरीब मराठ्यांच्या कोणाच्या मनात काही शंका असेल तर ती काढून टाका. मी तुमचं वाटोळं करणार नाही. तसं करायचं असतं तर एवढं केलं नसतं. मात्र माझ्यावरील तुमचा विश्वास ढळू देऊ नका. जर जीआरमधील एखाद्या शब्दात घोळ झाला असेल तर ते बदलण्याचा शब्द सरकारने दिला आहे. पण मराठवाड्यातील मराठे ओबीसीत गेले बाकी कोणाला काय समजायचं ते समजा. मराठ्यातील काही लोकं सोशल मीडियावर काहीतरी दिशाभूल करत आहेत. जे विरोधात बोलत आहेत त्यांनी 70 वर्षात काही दिले नाही. मी किमान समाजाला काहीतरी दिले, असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.











